भूषण रामराजेलोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रस्त्यांचा अभाव असलेल्या सातपुड्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाने आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये आकाशमार्गाने अर्थात ड्रोनद्वारे औषधी आणि लस पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाअंती सातपुड्यातील सावऱ्या दिगर, ता. धडगाव येथील आरोग्य उपकेंद्रात ड्रोनद्वारे लस आणि औषधी पोहोचवण्याची पहिली चाचणी १७ आणि १८ जुलै रोजी यशस्वी झाली आहे. या चाचणीतून केवळ १५ मिनिटांत २ किलो वजनाचा औषध साठा आरोग्य उपकेंद्राच्या दारात पोहोचला आहे.
२२ केंद्रे, १२० उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेवा पोहोचविण्याचे मोठे आव्हाननंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यांतील २२ आरोग्य केंद्रे व १२० च्या जवळपास उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेवा पोहोचविणे हे मोठे आव्हान आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. मित्ताली सेठी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांच्या मार्गदर्शनात सातपुड्यात ड्रोनद्वारे औषधसाठा पुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.यासाठी १७ आणि १८ जुलै रोजी जिल्हा आरोग्य विभागाला सहकार्य करत आयआयटी मुंबईचे प्रा. धावनील शुक्ला व त्यांच्या पथकाकडून नर्मदा काठावरील बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सावऱ्या दिगर येथे ड्रोन परीक्षण यशस्वी करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. रवींद्र सोनवणे उपस्थित होते.
होडीद्वारे प्रवास अन् चार तास करावी लागते पायपीटसातपुड्यात रस्ते नसल्याने पायपीट करत आरोग्य कर्मचाऱ्यांना लस आणि औषध साठ्याचा पुरवठा करावा लागतो. यासाठी तब्बल चार तासांपर्यंतचा कालावधी लागून औषध किंवा लस खराब होण्याची अधिक भीती असते.या प्रश्नावर आता पर्याय म्हणून ड्रोनद्वारे दुर्गम भागात औषध पुरवठा करण्याचे निश्चित झाले. बिलगाव आरोग्य केंद्र ते सावऱ्या दिगर यादरम्यान रस्ता नसल्याने सरदार सरोवराच्या बॅकवाॅटरमधून नागरिकांना होडी किंवा बार्जद्वारे प्रवास करावा लागतो. मात्र आता चाचणीदरम्यान केवळ १५ मिनिटांत औषधींचा साठा पोहोचविण्यात आला आहे.