आरक्षणावर गदा नको म्हणून आदिवासी आमदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला
By मनोज शेलार | Updated: October 4, 2023 18:55 IST2023-10-04T18:54:55+5:302023-10-04T18:55:14+5:30
आदिवासी समाजाच्या आरक्षणात इतर समाजाला सामावून घेण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याचा आरोप आदिवासी समाजाचा आहे.

आरक्षणावर गदा नको म्हणून आदिवासी आमदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला
नंदुरबार : आदिवासी समाजात इतर समाजाला आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी राज्यातील १८ आदिवासी आमदारांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्ह्यातील पाचपैकी तीन आमदार उपस्थित होते, तर एका आमदाराने पत्र पाठवून पाठिंबा जाहीर केला.
आदिवासी समाजाच्या आरक्षणात इतर समाजाला सामावून घेण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याचा आरोप आदिवासी समाजाचा आहे. असा निर्णय होऊ नये व तशा प्रकारच्या कुठल्याही प्रस्तावास आदिवासी समाजाचा विरोध राहील, यासंदर्भात निवेदन देणे व चर्चा करण्यासाठी राज्यातील आमदारांचे शिष्टमंडळ बुधवारी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी गेले होते. शिष्टमंडळाचे नेतृत्व विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी केले. या शिष्टमंडळात एकूण १८ आमदार सहभागी झाले होते. नवापूरचे आमदार शिरीषकुमार नाईक, शहादाचे आमदार राजेश पाडवी, विधान परिषद आमदार आमश्या पाडवी सहभागी झाले होते. अक्कलकुवाचे आमदार के.सी. पाडवी यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी तसेे लेखी पत्र आमदार झिरवाळ यांना देत या आपल्या नेतृत्वाखाली यासंदर्भातील कुठल्याही आंदोलनात, निर्णयात आपला पाठिंबा राहणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी सर्व माहिती जाणून घेत, आपणही स्वत: आदिवासी असल्याने आदिवासींवर अन्याय होणार नाही यासाठी लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले.