नंदुरबारातील सीसीटीव्हीचे 88 लाख रुपये पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 12:16 IST2018-10-05T12:16:41+5:302018-10-05T12:16:48+5:30
डीपीडीसने केले होते मंजूर : 90 कॅमेरे नव्याने बसविण्याचे नियोजन बारगळले

नंदुरबारातील सीसीटीव्हीचे 88 लाख रुपये पडून
नंदुरबार : शहरातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाने मागणी केल्यानुसार नंदुरबारात सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळाने तब्बल 88 लाख रुपये मंजुर केले होते. या वाढीव सीसीटीव्हींचा डीपीआर देखील तयार करण्यात आला होता. परंतु दीड वर्षात त्यावर काहीही कार्यवाही झाली नसल्यामुळे हा पैसा तसाच पडून आहे. त्यामुळे आजही केवळ 30 सीसीटीव्ही कॅमे:यांवरच पोलीस विभागाला भागवावे लागत आहे. परिणामी उत्सव व सणांच्या वेळी अतिरिक्त कॅमेरे लावण्याची वेळ येते.
नंदुरबार शहर हे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील शहर म्हणून पोलीस विभागात नोंदले गेले आहे. शहरात सण, उत्सव व इतर उपक्रमांच्या वेळी पोलिसांना बंदोबस्तासाठी कसरत करावी लागते. ही बाब लक्षात घेता दोन वर्षापूर्वी पोलीस विभागाने वाढीव सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी नियोजन केले होते. त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट देखील तयार करण्यात आला होता. त्या माध्यमातून निधीची मागणी करण्यात आली होती.
डीपीडीसीने दिले 88 लाख
याबाबत तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्या माध्यमातून यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीकडे प्रस्ताव सादर केला होता. डीपीडीसीने त्यावर चर्चा करून त्याकरीता 88 लाख रुपये मंजुर करून दिले होते. त्या माध्यमातून हे सीसीटीव्ही बसविण्यात येणार होते. त्यात कॅमे:यांसह कंट्रोल कॅबीन देखील राहणार होती.
90 कॅमेरे बसविले जाणार
मंजुर निधीतून तब्बल 90 कॅमेरे बसविण्यात येणार आहे. प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये उच्च दर्जाचे कॅमेर राहणार होते. एएनपीआर दर्जाचे कॅमेरे राहणार होते. या कॅमे:यांचे वैशिष्टे म्हणजे कितीही वेगाने अर्थात 140 किलोमिटर प्रती तास या वेगाने जरी वाहन गेले व कॅमे:याची नजर जर त्या वाहनाच्या नंबर प्लेटवर गेली तर ती नंबर प्लेट कॅच करण्याची क्षमता या कॅमे:यांमध्ये होती. त्यामुळे बाहेरून संशयीत वाहने, अवैध वाहतुकीची वाहने यावर नजर ठेवता येणार आहे.
शहराच्या चारही बाजुंना..
या प्रोजेक्टनुसार शहरातील चारही बाजुंना हे कॅमेरे लावण्यात येणार होते. अर्थात धुळेरोड, निझररोड, प्रकाशा रोड, नळवा रोड, धानोरा रोड, नवापूर व साक्री रस्त्यांवर मुख्य प्रवेशद्वारांसोबतच वर्दीळीचे ठिकाण, संवेदनशील ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, बाजाराचे ठिकाण आदी भागात हे 90 कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
सध्या 30 कॅमेरे कार्यान्वीत
सध्याच्या परिस्थितीत शहरात केवळ 30 कॅमेरे कार्यान्वीत आहेत. यातील अनेक कॅमे:यांची चार ते पाच वेळा दुरूस्ती झालेली आहे. त्यामुळे त्यांची दृष्य कॅच करण्याची क्षमता कमी झाली आहे.
शिवाय काही कॅमेरे रात्रीच्या अंधारातील दृष्य टिपण्यात देखील फारसे उपयोगी नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नवीन कॅमे:यांची सध्या आवश्यकता आहे. त्यामुळे कार्यवाही होणे आवश्यक आहे.सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीसाठी डीपीडीसीमार्फत निधी उपलब्ध होतो, परंतु त्यांच्या दुरूस्तीसाठी मात्र निधी राहत नसल्याची स्थिती आहे. नैसर्गिक कारणांमुळे कॅमेरे तुटले किंवा खराब झाले, कुणी मुद्दाम त्यांची तोडफोड केली तर असे कॅमेरे अनेक दिवस दुरूस्त होत नाहीत. परिणामी ते निकामी होतात. त्यामुळे कॅमेरे खरेदी करतांना आणि लावतांना त्यांच्या दुरूस्तीसाठीच्या निधीचीही तरतूद करून ठेवणे आवश्यक आहे.
शहरातील सीसीटीव्ही कॅमे:यांचा कंट्रोलरूम सध्या फडके चौकीत आहे. परंतु या ठिकाणी अपुरी जागा, सुरक्षेचा अभाव यामुळे कंट्रोल रूम पोलीस मुख्यालयात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच त्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.