८४ स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:11 IST2020-05-12T12:11:20+5:302020-05-12T12:11:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाने धुळे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवलेल्या १६० पैकी ८४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल सोमवारी प्राप्त ...

८४ स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाने धुळे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवलेल्या १६० पैकी ८४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला़ हे सर्व ८४ नमुने नेगेटिव्ह असून यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे़ एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अहवाल निगेटिव्ह आल्याची ही पहिलीच वेळ आहे़
नंदुरबार शहरात कोरोनाबाधित वृद्धेचा मृत्यू तर खाजगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण महिला आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती़ या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत १०० पेक्षा अधिक जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्याकरीता घेतले होते़ यामुळे रविवारपासून धुळे वैद्यकीय महाविद्यालयाकडे १६० स्वॅब नमुने प्रलंबित होते़ या नमुन्यांचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला़ यातील ८४ नमुने निगेटिव्ह आले असून यात मालेगाव येथे पोलीस बंदोबस्तासाठी पाठवण्यात आलेल्या कोरोनबाधित पोलीसाच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांचे अहवाल आहेत़ हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत़ आरोग्य विभागाने आतापर्यंत ९१२ जणांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी केली आहे़ यातील ७८९ नमुने हे निगेटिव्ह आहेत़ आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे दोन जणांचा बळी गेला आहे़ एकीकडे बळींचा आकडा कमी असल्याचा दिलासा असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होणाºया रुग्णांची संख्या वाढत आहे़ रविवारी अक्कलकुवा पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे़ येत्या दोन दिवसात शहाद्यातील उर्वरित पाच जणांचे अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह येण्याची शक्यता आहे़
बिहारला गेलेले विद्यार्थी पॉझिटिव्ह
दरम्यान एकीकडे दिलासादायक चित्र असताना दुसरीकडे अक्कलकुवा येथून नंदुरबार मार्गाने बिहार राज्यात गेलेल्या आणखी सात विद्यार्थ्यांचे पॉझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे़ बिहार राज्यातील सहरसा येथील जिल्हाधिकारी यांनी याबाबत माहिती दिली आहे़ अद्याप जिल्हा प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही़ येथून गेलेल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती़ जामिया संस्थेनेही विद्यार्थ्यांची सलग दोन दिवस आरोग्य तपासणी करुन त्यांना पुढील प्रवासासाठी पाठवले असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले होते़
लांबोळ्यातील मयत वृद्धेचे कोविड नियमानुसार अंत्यविधी
शहादा : तालुक्यातील लांबोळा येथील ६२ वर्षीय मयत महिलेवर कोविड नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत़ महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती असून प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी त्याला दुजोरा दिला होता़
लांबोळा येथील मृत महिलेस श्वसनाचा त्रास व अन्य आजाराची पार्श्वभूमी होती तथापि आरोग्य प्रशासनामार्फत सदर महिलेस श्वसनाचा त्रास असल्याने खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ प्राथमिक माहितीनुसार या महिलेचा कोणताही प्रवासाचा इतिहास नव्हता आणि जिल्हा रुग्णालयात महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता. रविवारी रात्री महिलेचा मृत्यू झाला होता़ सदर महिलेचा मृत्यू हा कोरोना मुळे झाला असल्याचा समज निर्माण झाला होता़ सोशल मीडियातही महिलेचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याचे मेसेज फिरल्याने भीती व चिंता निर्माण झाली होती़ परंतू सोमवारी स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तालुक्यासह प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे़
मृत महिलेचे अंत्यसंस्कार व उपचार करताना प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काळजी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़