सुसरी धरणात ८२ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:59 IST2020-08-26T12:59:49+5:302020-08-26T12:59:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गेल्या १५ दिवसापासून परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील सुसरी मध्यम प्रकल्पातील पाण्याचा साठा ...

सुसरी धरणात ८२ टक्के पाणीसाठा
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गेल्या १५ दिवसापासून परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील सुसरी मध्यम प्रकल्पातील पाण्याचा साठा दिवसागणिक वाढत आहे. काही दिवस पाऊस सुरू राहिल्यास या धरणात १०० टक्के पाणीसाठा होणार आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान धरणातील दोन खिडक्या उघडून पाण्याचा विसर्ग गोमाई नदीत सोडण्यात आला. याचसोबत सांडवा नाल्यातून पाणी वाहत असल्याने शेतकरी सुखावला आहे.
जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात परिसरात पावसाने चांगली दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र १५ ते २० दिवस पावसाने ताण दिल्याने शेतकरी चिंतेत झाला होता. उन्हाचा तडाखा सुरू झाल्यामुळे नागरिक, जनावरे लाहीलाही झाले होते. पुन्हा पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण होऊन पिकांनाही फायदा झाला. आता गेल्या १५ दिवसांपासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. मध्य प्रदेशात उगम पावलेल्या सुसरी नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणात सद्यस्थितीत पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यातील पाणी गोमाई नदीपात्रात सोडण्यात येते. या धरणामुळे परिसरातील सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. सुसरी धरणामुळे नवलपूर, अवगे-जुनवणे, मोहिदा, कलसाडी, पाडळदा, तिखोरा, पिंगाणे यासह सुमारे १५ गावातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी लाभ होतो.
दरम्यान, धरणात पाणीसाठा करण्याची जेवढी क्षमता आहे तेवढा पाणीसाठा होऊ द्यावा. कारण पावसाळ्याच्या शिल्लक दिवसात पाऊस झाला नाही तर धरणात असलेले पाणी वाहून वाया जाण्याची शक्यता आहे. हे पाणी वाहून गेल्यास शेतकऱ्यांना रब्बी हंगामात बागायती शेती करण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाने धरणातील पाणी सोडताना काळजी घेण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांकडून व्यक्त होत आहेत.