८१ टक्के पावसामुळे तूट निघतेय भरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 12:56 IST2020-08-24T12:55:34+5:302020-08-24T12:56:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असली तरी आणि सिंचन प्रकल्पांमध्येही ५० टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा झाला ...

८१ टक्के पावसामुळे तूट निघतेय भरून
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असली तरी आणि सिंचन प्रकल्पांमध्येही ५० टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा झाला असला तरी पावसाची तूट मात्र १५ टक्क्यांपर्यंत कायम आहे. दरम्यान, जिल्ह्यात सरासरी ८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या रिपरिपमुळे आणि सूर्यदर्शन होत नसल्याने मूग, उडीद या पिकांसह नवीन लागवड केलेल्या पपई पिकाला याचा फटका बसला आहे. काही ठिकाणी पीकं पिवळी पडू लागली आहेत तर काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. जुलैच्या अखरेपर्यंत जिल्ह्यात पावसाची ३५ टक्के तूट होती. ती गेल्या २२ दिवसात कमी होऊन १५ टक्क्याच्या आत आली आहे. पावसाचे प्रमाण असेच कायम राहिल्यास आॅगस्ट अखरेपर्यंत तूट भरून निघण्याची शक्यता आहे. पावसाची तूट असली तरी मात्र जिल्ह्यात लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढला आहे.
नवापूर तालुक्यात एकाच दिवसात १४० मि.मी.पावसाची नोंद झाली होती. त्याचा परिणाम चांगला झाला आणि नवापूर तालुक्यातील पूर्व भाग तसेच नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भागातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. त्याचा परिणाम लघु व मध्यम प्रकल्प तुडूंब भरले. नंदुरबार तालुक्यातील आणि नवापूर व साक्री तालुक्यातील सिमेवर असलेल्या धनीबारा, खोलघर, आंबेबारा हे प्रकल्प ओसंडून वाहू लागले. याच भागातील तसेच नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक मध्यम प्रकल्प देखील ७५ टक्केपेक्षा अधीक भरला. या प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच असल्याने प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नवापूर तालुक्यातीलच मध्यम प्रकल्प असलेला रंगावलीतही ९० टक्केपर्यंत पाणीसाठा झाला आहे. शहादा तालुक्यातील दरा प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. याशिवाय शिरवे, ता.नवापूर, खैरवे, ता.नवापूर, धनपूर, ता.तळोदा, वाघदी, ता.नवापूर, भुरीवेल, ता.नवापूर, राणीपूर, ता.शहादा आदी प्रकल्पांमध्येही ८० टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा झाला आहे.
अद्याप पावसाळ्याचा एक महिना बाकी आहे. या काळात सरासरीएवढा पाऊस झाला तरी जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा हा सरासरी ८० टक्केपेक्षा अधीक राहील अशी शक्यता आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना ते फायद्याचे ठरणार आहे.
अक्कलकुवा तालुका सर्वाधिक
आतापर्यंत सर्वाधिक पावसाची ७० टक्के नोंद अक्कलकुवा तालुक्यात झाली आहे. सुरुवातीला हा तालुका पावसाच्या सरासरीत जिल्ह्यात मागे होता. नंतर सरासरी भरून काढत हा तालुका जिल्ह्यात सर्वात पुढे गेला आहे. त्या खालोखाल शहादा तालुक्यात ६८ टक्के पाऊस झाला आहे. नवापूर तालुक्यात ६४ टक्के, तळोदा तालुक्यात ६३.७६ , नंदुरबार तालुक्यात ६३.६ टक्के तर धडगाव तालुक्यात ४८.५४ टक्के इतकी आहे.
जनजिवनावर परिणाम
संततधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. संततधार पावसामुळे बाजारपेठेतही शुकशुकाट दिसून येत आहे. सूर्यदर्शनच होत नसल्यामुळे आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे. विविध आजार आणि त्यात कोरोना यामुळे आरोग्य यंत्रणेवर देखील ताण वाढला आहे.
सततच्या पावसामुळे पीकं पिवळी पडू लागली आहेत. मूग, उडीद, चवळी या कडधान्य पिकाांना सर्वाधिक फटका बसला आहे.
सूर्यदर्शनच होत नसल्याने आणि पावसाची उघडीपही नसल्यामुळे शेतातील निंदणी, कोळपणी, पिकांना फवारणी आदी कामे होऊ शकत नाहीत.
अशा वातावरणामुळे पिकांवर विविध किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.
अनेक भागातील शेतांमध्ये पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होऊ शकत नसल्यामुळे पिकं सडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नुकसान होत आहे. यंदा अशा वातावरणामुळे उत्पादकता देखील कमी होणार आहे.