शहरातील ८० टक्के हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:33 IST2021-08-19T04:33:53+5:302021-08-19T04:33:53+5:30
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. यातून सावरत सुरु झालेल्या हाॅटेल व्यवसायाला गती ...

शहरातील ८० टक्के हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले पूर्ण
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. यातून सावरत सुरु झालेल्या हाॅटेल व्यवसायाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यात शासनाने हाॅटेल्समधील कर्मचारी व मालकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार शहरातील सर्वच हाॅटेल्समधील कर्मचाऱ्यांंचे लसीकरण पूर्णत्वास आल्याची माहिती आहे.
शहरातील हाॅटेल व्यावसायिक संघटनेने बैठक घेत सर्वांना सूचित केले होते. त्यानुसार सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्यात येत आहे. यातून आजअखेरीस ८० टक्के कर्मचाऱ्यांंचे लसीकरण पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. उर्वरित २० टक्के कर्मचाऱ्यांंमधील काहींचे प्रथम लसीकरण झाले आहे. हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांंच्या सोयीसाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र केंद्र निर्माण करण्याची मागणी आहे.
हॉटेल १
शहरातील सुभाष चाैकातील एका हाॅटेलमध्ये चाैकशी केली असता, ग्रामीण भागातून अपडाऊन करणारे आचारी, वेटर्स तसेच सफाई करणाऱ्या सर्व ९ जणांचे लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दाखवण्यात आले.
हॉटेल २
नेहरु चाैक परिसरातील एका हाॅटेलमध्ये चाैकशी केली असता, तेथील पाच जणांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे दिसून आले. उर्वरित दोघांचा पहिला डोस होऊन दुसरा डोस उपलब्ध नसल्याने थांबल्याचे सांगण्यात आले आहे.
नंदूरबारमधील सर्वच हाॅटेल्समध्ये काम करणारे ७० टक्के कर्मचारी हे ग्रामीण भागातून येतात. त्यांचे लसीकरण व्हावे यासाठी बैठक घेत सूचना केली होती. त्यानुसार पहिला आणि दुसरा डोस अनेकांचा झाला आहे. व्यवसायवाढी सोबत प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हाॅटेल व्यावसायिक प्रयत्नशील आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांचेही लसीकरण लवकर पूर्ण करु.
- बळवंत जाधव, अध्यक्ष, हाॅटेल व्यावसायिक संघटना, नंदुरबार.
आरोग्य विभागाकडून सर्वांनाच लस दिली जात आहे. जिल्ह्यात लसीकरणाला वेग आहेच. डोसेजच्या उपलब्धतेनुसार सर्वांना लस देण्याचा प्रयत्न केला जातो. छोट्या-मोठ्या संघटनांनी लसीकरण वेळेत पूर्ण करुन घेतले पाहिजे. यातून त्यांचे व्यवसाय पूर्ववत होतील.
- डॉ. के.डी.सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
फेरीवाले दुर्लक्षित ?
एकीकडे हाॅटेल व्यावसायिकांनी त्यांच्या कामगारांचे लसीकरण पूर्ण करण्याचा सपाटा लावला असताना शहरातील ३०० च्या जवळपास किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या लसीकरणाबाबत ठोस अशी माहिती समोर आलेली नाही. संबंधित विक्रेत्यांची कोणतीही संघटना नसल्याने त्यांच्या लसीकरणाची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु एक-दाेन ठिकाणी चाैकशी केली असता लसीकरण पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.