८० खाटांचे कोविड आयसोलेशन सेंटर मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:25 IST2020-07-08T12:23:50+5:302020-07-08T12:25:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणू अहवाल आला असला तरी काही रुग्णांमध्ये त्याची लक्षणे आढळून येत नाहीत अशा ...

80 bed covid isolation center sanctioned | ८० खाटांचे कोविड आयसोलेशन सेंटर मंजूर

८० खाटांचे कोविड आयसोलेशन सेंटर मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना विषाणू अहवाल आला असला तरी काही रुग्णांमध्ये त्याची लक्षणे आढळून येत नाहीत अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहादा येथे ८० खाटांच्या कोविड आयसोलेशन सेंटरला मंजुरी मिळाली असून ते कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर डॉ.चेतन गिरासे यांनी दिली.
शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेकांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असला तरी त्यांच्यामध्ये कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणे आढळून येत नाही. अशा रुग्णांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार केला जात आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरवर ताण वाढत चालला आहे. आधीच अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू संक्रमण झाले असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयावरील भार कमी करण्यासाठी शहादा येथे कोविड आयसोलेशन सेंटर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. प्रशासनाच्या प्रयत्नाला जिल्हा रुग्णालयाने तसेच जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली असून ८० खाटांचे कोविड आयसोलेशन सेंटर मंजूर केले आहे. मोहिदा शिवारातील समाज कल्याण विभागाच्या चार वसतिगृहापैकी एका इमारतीत क्वारंटाईन सेंटर असणार आहे तर दोन अन्य इमारतीत अहवाल पॉझिटीव्ह आला असला तरी ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आढळून येत नाही अशा रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. एकूण ८० बेडची क्षमता असणार आहेत तर चौथ्या इमारतीत कोरोना बाधीत व लक्षणे असणाºया रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
शासनाने यासाठी चार डॉक्टर व आठ नर्सेस त्याचप्रमाणे एक्स-रे, ईसीजीसाठी तंत्रज्ञ अशा दोन टीमला मंजुरी दिली आहे. प्रत्येकी दहा दिवस एक टीम कार्यान्वित असेल. त्यानंतर अकराव्या दिवसापासून दुसरी टीम कार्यरत असणार आहे. दहा दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करणाºया अधिकारी व कर्मचाºयांच्या टीमला दहा दिवसांची सुटी अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे औषधोपचारासाठी मोठ्या प्रमाणात केंद्र व राज्य शासनाच्या आदेशान्वये रुग्णाला देण्यात येणारा उपचार व औषध पुरवठा केला जाणार आहे.
शासनाची मान्यता मिळाली असली तरी प्रत्यक्षात सेंटर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या संपूर्ण प्रशासकीय व तांत्रिक बाबींची पूर्तता प्रशासनातर्फे केली जात असून लवकरात लवकर हे कोविड आयसोलेशन सेंटर कार्यान्वित होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे डॉ.गिरासे यांनी सांगितले.

केंद्र व राज्य शासनाने कोविड-१९ च्या मार्गदर्शक तत्व व नियमावलीमध्ये बदल केला आहे. नवीन नियमानुसार बाधीत रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या अतिसंपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक अलग ठेवण्याची संकल्पना बदलून सीसीसी करण्यात आली. सस्पेक्ट वॉर्ड (प्राथमिक संशयित संपर्क) आणि आयसोलेशन वॉर्ड (एम्प्टोमॅटीक पॉझिटीव्ह रूग्ण) हे प्रमुख घटक आहेत. प्रस्तावित कोविड आयसोलेशन सेंटरमध्ये आवश्यक मूलभूत व पायाभूत सुविधा जवळजवळ पूर्ण करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय कर्मचाºयांची भरती उच्चस्तरावर केली जाईल. इतर जिल्ह्यातून स्थलांतरित किंवा प्रवासी यांचे स्वॅबचे नमुने घेण्यासंदर्भात कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. परदेशी स्थलांतरितांनासुद्धा केवळ सात दिवस अलग ठेवण्याचा सल्ला शासनाने दिला आहे. -डॉ.चेतन गिरासे, प्रांताधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर, शहादा.

Web Title: 80 bed covid isolation center sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.