स्थलांतरीत ७०० मजूर परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:10 IST2020-05-03T13:10:02+5:302020-05-03T13:10:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : केंद्र शासनाने मजुरांच्या गावाकडील स्थलांतरास परवानगी दिल्यामुळे गुजरातमधील ७०० मजूर तळोद्यात दाखल झाले असून, ...

700 migrant workers returned | स्थलांतरीत ७०० मजूर परतले

स्थलांतरीत ७०० मजूर परतले

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : केंद्र शासनाने मजुरांच्या गावाकडील स्थलांतरास परवानगी दिल्यामुळे गुजरातमधील ७०० मजूर तळोद्यात दाखल झाले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वॉरंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान शनिवारी दाखल झालेल्या मजुरांपैकी एका महिलेस ताप, खोकला, सर्दीची लक्षणे आढळून आल्यानंतर तिला उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.
कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासनाने पुन्हा १७ मे २०२० पावेतो लॉकडाऊन वाढविले आहे. तथापि गुजरात अथवा इतर ठिकाणी रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या मजुरांना आपल्या गावाकडे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि कारखाने बंद झाल्यामुळे सदर मजुरांना रोजगाराअभावी उपासमारीस तोंड द्यावे लागत होते. साहजिकच मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे.
शुक्रवार व शनिवारी असे साधारण ७०० मजूर तळोद्यात दाखल झाले आहेत. हे मजूर गुजरातमधील भरूच, मांडवी या ठिकाणी काम करीत होते. तेथून ते ट्रक, टेम्पोने आले होते. पोलिसांनी त्यांना आमलाड येथील विलगीकरण कक्षात आरोग्य तपासणीसाठी पाठविले. या मजुरांची तपासणी येथील आरोग्य यंत्रणेने केली आहे. सर्व मजुरांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येवून त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारून घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तळोदा तालुक्यातील मोरवड, रापापूर, चौगांव, वाल्हेरी येथील साधारण ४०० ते धडगाव तालुक्यातील ३०० मजूर आहेत. याबाबत धडगाव तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनादेखील कळविण्यात आले आहे.
दरम्यान, शनिवारी दाखल झालेल्या मजुरांपैकी एक मजूर महिलेस ताप, खोकला, सर्दीची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली. या वेळी आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, तहसीलदार पंकज लोखंडे उपस्थित होते.

Web Title: 700 migrant workers returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.