गुजरातमधून ६७६ मजूर आपल्या गावी परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:40 IST2020-05-12T12:40:44+5:302020-05-12T12:40:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या प्रयत्नामुळे गुजरात येथे अडकलेले ६७६ मजूर ...

गुजरातमधून ६७६ मजूर आपल्या गावी परतले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या प्रयत्नामुळे गुजरात येथे अडकलेले ६७६ मजूर आपल्या गावी परतले आहेत. याशिवाय राज्यातील पुणे, औरंगाबाद आणि पालघर येथून देखील नागरिकांना जिल्ह्यात आणण्यात आले आहे. पालकमंत्री अॅड.के.सी. पाडवी यांच्या सूचनेनुसार दोन्ही प्रकल्प कार्यालयांनी मजुरांना परत आणण्यासाठी नियोजन केले.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाशी आणि जिल्ह्यातील समन्वयक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. तिथल्या मजुरांशी संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी शैलेश पाटील, अमोल मटकर, राहूल इधे आणि किरण मोरे या चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. द्वारका येथील २२०, पोरबंदर ५५, वापी १०३, आणंद ३७, जामनगर ५९, बडोदा ३२, गांधीनगर ४३, भरूच १०२, दमण २५ अशाप्रकारे एकूण ६७६ मजुरांना परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्प कार्यालयाच्या अधिकारी-कर्मचाºयांनी परिश्रमपूर्वक सर्व मजुरांच्या जिल्हानिहाय याद्या तयार करून वाहनाची सोय केली. आदिवासी विभागामार्फत न्यूक्लिअस बजेटच्या माध्यमातून वाहन खर्चाची सुविधा करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे यातील बरेचसे मजूर गावाकडे परतले असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सीमेवर सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. तसेच या मजुरांच्या भोजनाचीदेखील सोय करण्यात आली. मजुरांचा रोजगार गेल्याने त्यांना मनरेगाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्यात येणार आहे.
सर्व मजूर विविध ठिकाणी विखुरलेले असल्याने त्यांना एका ठिकाणी आणून परत आणणे हे मोठे आव्हान होते. अधिकारी-कर्मचाºयांच्या उत्तम समन्वयाने ते शक्य झाले. पुढच्या टप्प्यात या मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपल्या गावात परतल्याचा त्यांना आनंद असल्याने संपूर्ण टीमसाठी ही समाधानाची बाब आहे.
-वसुमना पंत,
प्रकल्प अधिकारी, नंदुरबार.
गुजरातमधील नऊ जिल्ह्यातून आणि राज्यातील विविध भागातून आदिवासी नागरिकांना त्यांच्या गावात आणण्यासाठी एकाचवेळी विविध पातळ्यांवर नियोजन सुरू होते. त्यांची माहिती मिळविणे हेदेखील आव्हान होते. नंदुरबार आणि गुजरातच्या प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळाल्याने हे मजूर गावाकडे परतू शकले.
-अविशांत पांडा,
प्रकल्प अधिकारी, तळोदा.