कोरोना काळातही घर अन् पाणीपट्टी वसुलीतून ५९५ ग्रामपंचायती ‘आत्मनिर्भर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST2021-06-16T04:40:52+5:302021-06-16T04:40:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना महामारीमुळे ग्रामपंचायत स्तरावरील विकासनिधी मिळवण्यात ग्रामपंचायतींना अडचणी आल्या होत्या. यातून गेल्या वर्षात विकास ...

कोरोना काळातही घर अन् पाणीपट्टी वसुलीतून ५९५ ग्रामपंचायती ‘आत्मनिर्भर’
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना महामारीमुळे ग्रामपंचायत स्तरावरील विकासनिधी मिळवण्यात ग्रामपंचायतींना अडचणी आल्या होत्या. यातून गेल्या वर्षात विकास कामे ठप्प होती. पहिल्या लाटेतील हा अनुभव गाठीशी ठेवून यंदा ग्रामपंचायतींतर्गत निवासी असलेल्या नागरिकांकडून घर आणि पाणीपट्टी वसुलीवर भर देण्यात आल्याने ८३ टक्के रक्कम गोळा होऊन कामकाजाला गती आली आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यातील ५९५ ग्रामपंचायतींच्या विकासकामांना गेल्या वर्षापासून खीळ बसली आहे. जिल्हा परिषद स्तरावरून निधी मिळणार असला तरी ग्रामपंचायतींची पाणी पुरवठा योजना दुरुस्ती कामे, पाणी योजना, पथदिवे, ग्रामपंचायत कार्यालयाचे लाईट बिल, काम करणारे कर्मचारी, संगणक चालक यांचे वेतन देण्यासाठी तसेच दैनंदिन खर्च भागवण्यासाठी पैशांची गरज भासत होती. वीज बिल भरणा तसेच इंटरनेट बिल भरणा नसल्याने अनेकांचे कनेक्शन कापण्यात आल्याचे प्रकार घडले होते. यातून मार्ग काढण्यासाठी ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी यांच्याकडून यंदा घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीवर भर देण्यात आल्याने ८३ टक्के वसुली झाली आहे. या वसुलीतून जिल्ह्यातील ग्रामपंचायती एकप्रकारे आत्मनिर्भर झाले असल्याचे समोर आले आहे. या वसुलीचा लाभ त्या-त्या ग्रामसेवक आणि ग्रामविस्तार अधिकारी यांना होणार असून सर्वच ग्रामपंचायतींची वसुली ही ७० टक्क्यांंच्या पुढे असल्याने त्यांना वेतनवाढही मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वसुलीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.
घरपट्टी वसुली
२०२०-२१ या वर्षात नंदुरबार तालुक्यातून २ कोटी १५ लाख पैकी १ कोटी ८० लाख, नवापूर तालुक्यातून ३ कोटी २१ लाखापैकी २ कोटी ५० लाख शहादा तालुक्यातील थकीत ५ कोटी ३६ लाखांपैकी २ कोटी ५० लाख, तळोदा तालुक्यात १ कोटी ८५ हजारपैकी १ कोटी १७ लाख, अक्कलकुवा तालुक्यात १ कोटी ६१ लाखपैकी ९३ लाख ४२ हजार, धडगाव ४५ लाख ६६ हजार पैकी ३९ लाख ५२हजार वसुली झाली असल्याची माहिती आहे.
पाणीपट्टी वसुली
नंदुरबार तालुक्यात १ कोटी ७ लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. यापैकी ९१ लाख १२ हजार रुपयांची वसुली झाली. शहादा तालुक्यात २ कोटी ७८ लाखापैकी २ कोटी ३९ लाखाची वसुली झाली. नवापूर तालुक्यात १ काेटी ८३ लाखापैकी १ कोटी ५९ लाख, तळोदा तालुक्यात ६७ लाख ७१ हजारपैकी ५२ लाख ८५ हजार, अक्कलकुवा ६४ लाख ४२ हजारपैकी ५७ लाख १६ हजार तर धडगाव तालुक्यात ३३ लाख रूपयांची वसुली झाली आहे.
१६ कोटी रुपयांची वसुली जिल्ह्यातील ५९५ ग्रामपंचायतींकडे पाणीपट्टीचे ६ कोटी ९२ लाख २३ हजार तर घरपट्टीचे १३ कोटी ५४ लाख रुपये थकीत होते. यापैकी एकूण १६ कोटी ८० लाख ४० हजार रुपयांची वसुली झाली आहे.
१६ कोटी रुपयांची वसुली..
जिल्ह्यातील ५९५ ग्रामपंचायतींकडे पाणीपट्टीचे ६ कोटी ९२ लाख २३ हजार तर घरपट्टीचे १३ कोटी ५४ लाख रुपये थकीत होते. यापैकी एकूण १६ कोटी ८० लाख ४० हजार रुपयांची वसुली झाली आहे.