जिल्ह्यातील २४ हजार नागरिकांवर जनआरोग्य योजनेतून ५२ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST2021-05-07T04:32:09+5:302021-05-07T04:32:09+5:30

नंदुरबार : एप्रिल २०१७ पासून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत २४ हजार १०३ शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या ...

52 crore spent on public health scheme for 24 thousand citizens in the district | जिल्ह्यातील २४ हजार नागरिकांवर जनआरोग्य योजनेतून ५२ कोटी खर्च

जिल्ह्यातील २४ हजार नागरिकांवर जनआरोग्य योजनेतून ५२ कोटी खर्च

नंदुरबार : एप्रिल २०१७ पासून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत २४ हजार १०३ शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून, यासाठी ५२ कोटी १९ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात पाच खासगी, तर चार सरकारी रुग्णालयांमध्ये ही योजना सध्या सुरू आहे.

दारिद्र्यरेषेवरील व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींसाठी शासनाकडून महात्मा फुले जनआरोग्य योजना चालविण्यात येते. याअंतर्गत ९७१ आजारांवर दीड लाखापर्यंत मोफत उपचार व देखभाल खर्च देण्यात येतो. गेल्या वर्षात कोरोनामुळे नागरिकांचा खर्च वाढून आर्थिक समस्याही वाढल्या आहेत. यातून महात्मा फुले जनआरोग्य योजना मात्र सहाय्यकारी ठरत असल्याचे दिसून आले आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २०२० व २०२१ या वर्षात एकूण २२३ जणांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यातील केवळ पाचजणांचे उपचारानंतरचे क्लेम शिल्लक होते. मागील वर्षात ५६ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले होते. ३७ जणांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, तर ११ जणांचे जनआरोग्य योजनेंतर्गतचे उपचारांचे शेड्यूल तयार करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्हा रुग्णालय, नवापूर आणि तळोदा उपजिल्हा रुग्णालय, अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात, तर नंदुरबार येथील तीन आणि शहादा येथील दोन खासगी रुग्णालयांत या योजनेंतर्गत उपचार होत आहेत. नागरिकांना गंभीर व आवाक्यातील आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जात असल्याने जनआरोग्य योजनेतील नागरिकांचा सहभाग वाढला असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

नियुक्त कंपनीकडून मिळाली मंजुरी

२०१७ पासून नावात बदल करून लागू करण्यात आलेल्या जनआरोग्य योजनेत नंदुरबार जिल्ह्यातून एकूण २४ हजार १६३ नागरिकांचे क्लेम शासनाने नियुक्त केलेल्या इन्शुरन्स कंपनीकडे करण्यात आले होते. यासाठी इन्शुरन्स कंपनीकडे ५९ कोटी १९ लाख ३१ हजार ५३५ रुपयांची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, इन्शुरन्स कंपनीकडून पूर्ण झालेल्या २२ हजार ५१४ शस्त्रक्रियांसाठी नियुक्त केलेल्या खासगी व शासकीय रुग्णालयांना ५२ कोटी १९ लाख २६ हजार ८४२ रुपयांचा खर्च वर्ग करण्यात आला आहे.

योजनेत शस्त्रक्रियेनंतर १० दिवसांची औषधी आणि घरी जाण्यासाठी भाडे देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुर्गम भागातील दुर्धर व दीर्घ आजारांनी पीडित असलेल्या अनेकांना या योजनेतून खर्च मिळाल्याने त्यांच्यावर उपचार शक्य झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

योजना चांगली आहे. यातून अनेकांना लाभ झाला आहे. गाेरगरीब रुग्णांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक ठरली आहे. दीड लाखापर्यंत उपचारांचा खर्च निघत असल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. एपीएल आणि बीपीएल अशा दोन्ही प्रकारच्या नागरिकांना योजनेतून शस्त्रक्रियांसाठी खर्च मिळून उपचार झाल्याने ते बरे झाले आहेत.

- डाॅ. के. डी. सातपुते,

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नंदुरबार.

Web Title: 52 crore spent on public health scheme for 24 thousand citizens in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.