जिल्हा परिषद शाळांमधील ३१५ वर्गखोल्या धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST2021-06-17T04:21:41+5:302021-06-17T04:21:41+5:30
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातील अनेक शाळाखोल्यांची अवस्था जीर्ण बनली आहे. ३१५ पेक्षा अधिक शाळाखोल्या निर्लेखित करून त्यांचे ...

जिल्हा परिषद शाळांमधील ३१५ वर्गखोल्या धोकादायक
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातील अनेक शाळाखोल्यांची अवस्था जीर्ण बनली आहे. ३१५ पेक्षा अधिक शाळाखोल्या निर्लेखित करून त्यांचे नव्याने बांधकाम करण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी ८० शाळाखोल्यांच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असून लवकरच त्यांचे बांधकाम केले जाणार आहे.
जिल्ह्यातील अनेक भागांतील शाळाखोल्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. सर्वाधिक शाळाखोल्यांची दुरवस्था ही सातपुड्यातील दुर्गम भागात आहेत. या शाळाखोल्या बांधकामासाठी विविध योजनांतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील शैक्षणिक वर्षात यातील निम्म्यापेक्षा अधिक शाळाखोल्या बांधून मिळतील यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
यंदा कोरोनामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उघडल्याच नाहीत. त्यांची देखरेख व दुरुस्तीदेखील झाली नाही. परिणामी शाळाखोल्या खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्राथमिक शाळांची संख्या १९०० असून शाळाखोल्यांची संख्या तीन हजार ७८३ इतकी आहे. त्यातील तब्बल ३१९ शाळाखोल्या या खराब झाल्या असून त्यांना निर्लेखित करण्यात आले आहे.
जिल्ह्यात तीन हजार ५६३ शाळाखोल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आहेत, तर २१८ खोल्या या मोफत उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. अर्थात मोफत खोल्या या त्या-त्या गावातील ग्रामपंचायतींनी सभागृहे व खासगी घरे या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. सुमारे ८० खोल्यांचे बांधकाम होणार असून त्यातील काही आकांक्षित जिल्हा निधीतून होणार आहेत.
गळक्या शाळाखोल्यांमुळे अपघाताची भीती...
n अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील ५० पेक्षा अधिक शाळाखोल्या या गळक्या आहेत. पावसाळ्यात शिक्षकांना प्लास्टिक कागद किंवा ताडपत्री लावून गळती थांबवावी लागते. अशावेळी मोठा अपघात होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे अशा शाळाखोल्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला जातो, परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. खापर व परिसरातील सपाटीवरील गावांमधील शाळाखोल्यांची अवस्थादेखील दयनीय आहे. त्याबाबतही ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.
n सातपुड्यातील अनेक गावांमधील शाळा या कुडाच्या घरात भरविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता राहत नाही. शिक्षकांनादेखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दुर्गम भागातील अशा गाव व पाड्यांमध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्यामुळे ही समस्या आहे. त्यावर उपाय म्हणून बांबू शाळेचा प्रयोग राबविण्याचे ठरविण्यात आले, परंतु तो देखील यशस्वी होऊ शकला नाही; नंतर फायबर शीटपासून शाळाखोल्या बांधण्याचे ठरविण्यात आले, परंतु त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.