मोलगीचे ३ पोलीस पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 12:00 IST2020-06-28T12:00:48+5:302020-06-28T12:00:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : मोलगी येथील तीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिघांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात ...

मोलगीचे ३ पोलीस पॉझिटीव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : मोलगी येथील तीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिघांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संपर्कातील १३ जणांना खापर येथील विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सह त्यांच्या कुटुंबातील तिघांना कोरोना ची लागण झाली होती. याच पोलिस ठाण्यातील अनुक्रमे ५२ ,४६, ३० वर्षीय पुरुष पोलीस कर्मचारी यांच्या कोरोना अहवाल काल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. या पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या संपर्कातील १३ जणांना खापर येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले आहे. मोलगी पोलिस ठाण्यातील ३ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यामुळे मोलगी पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांची तपासणी करण्यात येऊन पोलीस ठाण्यासह शहरांमध्ये ग्रामपंचायतीतर्फे निर्जंतुकीकरण करण्यात आले. मोलगी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले काही पोलीस कर्मचारी अक्कलकुवा येथील पोलिस वसाहतीमध्ये राहत असल्यामुळे कर्मचारी वसाहत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.
तहसीलदार सचिन मस्के, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, निवासी नायब तहसीलदार विजयसिंग कचवे, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल मालखेडे, डॉ. सागर गयधर, ग्राम विकास अधिकारी तायडे, इरफान मकरानी आदीं उपस्थित होते.
मोलगी मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ वर पोहोचली असून यातील सर्वाधिक रुग्ण पोलीस खात्यातील आहेत. पोलिसांमध्ये हा संसर्ग कसा वाढला याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सातपुड्यात या आजाराचा प्रसार होणे जिल्हा तालुका प्रशासनासाठी भविष्यात अधिक चिंतेची बाब करणार आहे.
कोरोना बाधीताच्या जवळच्या संपर्कातील १३ जणांना मांडवी, ता.धडगाव येथील विलगीकरण कक्षात दाखल कण्यात आले आहे. हे सर्व मोलगी येथील असल्याचे समजते. मांडवी विलगीकरण कक्षात प्रथमच विलगीकरणासाठी ठेवण्यात आले आहे. धडगाव तालुक्यात अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही. हा तालुका अद्यापही कोरोनामुक्त आहे. त्यामुळे मांडवी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या हायरिस्क कॉन्टक्ट लोकांना ठेवण्यात आल्याने तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वॅब अहवालांची प्रतीक्षा वाढली...
स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांची संख्या आणखी वाढली आहे. शनिवारी दिवसभरात एकुण ३२ अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. दिवसभरात २७ जणांचे स्वॅब घेण्यात आले. आता एकुण ७९ जणांचे अहवालांची प्रतिक्षा कायम आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात ८९ जण उपचार घेत आहेत. तर ६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत एकुण १,९२४ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. तर १,६६८ जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत.