विसरवाडी व बालआमराई येथे दोन दिवसात २१हजार कोंबड्या व ५९ हजार अंडी नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST2021-02-23T04:48:22+5:302021-02-23T04:48:22+5:30
विसरवाडी येथील बंगले वाला पोल्ट्री ही १९७८ मध्ये उभारण्यात आली होती. अद्यापपर्यंत विसरवाडी परिसरात बर्ड फ्लूची लागण झालेली नव्हती. ...

विसरवाडी व बालआमराई येथे दोन दिवसात २१हजार कोंबड्या व ५९ हजार अंडी नष्ट
विसरवाडी येथील बंगले वाला पोल्ट्री ही १९७८ मध्ये उभारण्यात आली होती. अद्यापपर्यंत विसरवाडी परिसरात बर्ड फ्लूची लागण झालेली नव्हती. मात्र प्रथमच बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून पहिल्या दिवशी २१ फेब्रुवारी रोजी जावेद पोल्ट्री बालआमराई येथे आठ हजार ३०८ कोंबड्या नष्ट करण्यात आले तर ४०,४२८ अंडी नष्ट करण्यात आली असून उर्वरित दोन पोल्ट्रीमधील मोहीम आज सोमवारी सकाळी राबविण्यात आली. यात विसरवाडी येथील जावेद पोल्ट्रीची तीन हजार ४७० तसेच बंगलेवाला पोल्ट्रीची नऊ हजार ६५ कोंबड्या असे १२,५३५ कोंबड्या आज नष्ट करण्यात आल्या. तर जावेद पोल्ट्रीमधील सहा हजार ७७८ अंडी आणि बंगलावालामधील १२ हजार ९९० अंडी अशी एकूण १९ हजार ६८ अंडी नष्ट करण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन विभागाची एकूण बारा पथके येथे दाखल झाले.
नवापूर येथे फेब्रुवारी २००६ मध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला होता तरीदेखील त्यावेळी मात्र विसरवाडी परिसर बर्ड फ्लूपासून लांब होते.
जावेद पोल्ट्री बालअमराई येथे २० फेब्रुवारी रोजी पोल्ट्रीतील ६०३ कोंबड्या मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या. याबाबत माहिती मिळताच प्रशासनाने सतर्कता बाळगत तत्काळ येथील मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तेथील प्रयोगशाळेने संबंधित अहवाल बाधित असल्याचा अहवाल दिल्यानंतर रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विसरवाडी येथील जावेद पोल्ट्री वरील कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली तसेच अंडी नष्ट करण्यात आली होती.
पशुसंवर्धन विभागाची बारा पथके येथे दाखल झाली आहेत. अधिकारी व कर्मचारी मिळून १२० व्यक्तींचा वाहनांसह फौजफाटा पहिल्यांदाच याठिकाणी दाखल झाला. बर्ड फ्लूचा पहिल्यांदाच शिरकाव झाल्याने विसरवाडी येथील पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर असून व्यावसायिकांची लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. तर पोल्ट्रीवर काम करणारे शेकडो कामगार बेरोजगार होणार आहेत.
तहसीलदार मंदार कुलकर्णी, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. के.टी पाटील, प्रादेशिक सहआयुक्त डॉ. बाबुराव नरवाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. यु. डी. पाटील सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, डॉ. योगेश गावीत, पशुधन विकास अधिकारी डॉ. दिनेश गावीत, ग्रामसेवक अर्चना वसावे, बी.एन सोनवणे, मंडळ अधिकारी नरेंद्र महाले तलाठी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.