अक्कलकुवा तालुक्यात दोन महिन्यात २०० जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST2021-05-27T04:32:19+5:302021-05-27T04:32:19+5:30
राज्यासह जिल्ह्यात यंदा कोरोनामुळे नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा कोरोना बळींचा आकडा हा ७५० च्या पुढे गेला आहे. यातून ...

अक्कलकुवा तालुक्यात दोन महिन्यात २०० जणांचा मृत्यू
राज्यासह जिल्ह्यात यंदा कोरोनामुळे नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा कोरोना बळींचा आकडा हा ७५० च्या पुढे गेला आहे. यातून भीती वाढून अनेकांनी धसका घेतला होता. यातून ज्येष्ठ नागरिकांच्या चिंता वाढून त्यांना वृद्धापकाळात हृदयविकाराचे धक्के सहन न झाल्याने त्यांचे मृत्यू झाल्याच्या नोंदी तालुक्यात आहेत. याबाबत तालुक्यातील विविध गावांमधील मयतांच्या नातलगांनी केलेल्या मृत्यू दाखल्यांच्या नोंदी तपासल्या असता, १८९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात खापर, घंटाणी, कंकाळी, काकरपाडा, मोलगी, सोरापाडा, अक्कलकुवा, ब्राह्मणगाव, मालपाडा, ईटवाई, कोयलीविहीर, ओहवा, गव्हाळी, डोडवा, नवापाडा, सिंगपूर बुद्रूक, जानीआंबा, मांडवीआंबा, खटवाणी, आंबाबारी, डनेल, तालंबा, काकडीआंबा, रामपूर, शेंदवण, बिजरीगव्हाण, बेडाकुंड, मक्राणीफळी, अक्कलकुवा या गावांमध्ये झालेल्या मृत्यूच्या या नोंदी आहेत. वृद्धापकाळाने मयत झालेल्यांची संख्या सर्वाधिक असून त्यानंतर दीर्घ आजार, मधुमेह, टीबी, जुना दमा यासह इतर आजारांनी मयत झालेल्यांची संख्या समोर आली आहे. तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील विविध भागात आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे ठरत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील आरोग्य सोयी ह्या यथातथाच असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, परंतु वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नसल्याचे प्रकार कायम समोर आले आहेत. यातून आता मृत्यूचा दर वाढला असल्याने त्याचा योग्य त्या पद्धतीने शोध घेत तालुकावासीयांना दिलासा देण्याची गरज आहे. विविध आजारांनी हे मृत्यू झाले असले तरी त्या आजारांवर उपचार करता येत नसल्याने अनेक जणांचा घरीच मृत्यू आहे. यामुळे आरोग्य विभागाने गंभीर आजारी रुग्णांची काळजी घेण्यासाठी यंत्रणा उभी करण्याची अपेक्षा आहे.