आदिवासी भागात शेळी व कुक्कुट पालनासाठी २०० कोटी देणार- के. सी. पाडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST2021-07-20T04:21:34+5:302021-07-20T04:21:34+5:30
राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे राजपूत लॉन्स येथे आयोजित खावटी अनुदान योजनेअंतर्गत अन्नधान्य, ...

आदिवासी भागात शेळी व कुक्कुट पालनासाठी २०० कोटी देणार- के. सी. पाडवी
राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे राजपूत लॉन्स येथे आयोजित खावटी अनुदान योजनेअंतर्गत अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ॲड. सीमा वळवी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल, दिलीप नाईक, गोवाल पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी उपस्थित होते.
पुढे बोलताना ॲड. पाडवी यांनी सांगितले की, आदिवासी भागातील स्थलांतर थांबविण्यासाठी या भागाचा विकास होणे गरजेचे आहे. दुर्गम भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास त्यांचे स्थलांतर रोखता येऊन जीवनमानात सुधारणा घडवून आणता येईल. आमचुरसारख्या स्थानिक नैसर्गिक उत्पादनांवर प्रक्रिया करून रोजगार निर्मिती करणे शक्य आहे. त्यादृष्टीने शेळी आणि कुक्कुटपालनास प्रोत्साहन देण्यात येईल.
आदिवासी बांधवांसाठी पूर्वी खावटी कर्ज योजना राबविली जात असे. कोरोना काळात ही योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहे. खावटी योजनेअंतर्गत राज्यातील १२ लाख कुटुंबांना लाभ देण्यात येणार आहे. सुमारे १० लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर २००० रुपये जमा करण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन अनुदान मिळाल्याची खात्री करून घ्यावी. काही नागरिक रोजगारानिमित्त बाहेर असल्यास अशा पात्र लाभार्थ्यांचा समावेशदेखील करण्यात येणार आहे. यावर्षी त्यासाठी तरतूद करण्यात येईल.
दुसऱ्या टप्प्यात खावटी कीटच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. यात ११ प्रकारच्या वस्तू आणि खाद्यतेल आहे. खावटी किटमधील वस्तूंचा दर्जा चांगला ठेवण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गरीब आदिवासी बांधवांना खराब वस्तूंचे वाटप झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
कार्यक्रमात बोलताना ॲड. सीमा वळवी यांनी सांगितले की, कोरोनाकाळात गुजरातमध्ये रोजगारासाठी गेलेल्या अनेक आदिवासी बांधवांचे रोजगार गेलेत. त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहेत. भूमिहीन, विधवा महिलांना ही योजना अधिक दिलासा देणारी आहे. पालकमंत्री पाडवी यांच्या नेतृत्वात जिल्ह्याने चांगली प्रगती केली आहे. कोरोनाकाळात आरोग्य सुविधांचा चांगला विकास करण्यात आला आहे.
प्रास्ताविक महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रतिभा पवार यांनी केले. त्यांनी खावटी अनुदान योजनेची माहिती दिली. नंदुरबार प्रकल्पांतर्गत ७१ हजार २१५ अनुसूचित जमातीच्या नागरिकांचे अर्ज भरून घेण्यात आले. यातील ६३ हजार २२७ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पहिल्या टप्प्यातील २००० रुपयांप्रमाणे अनुदान जमा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पालकमंत्री ॲड. पाडवी यांच्या हस्ते होळ तर्फे हवेली येथील १११, दहिन्दुले खुर्द ७७, दहिंदुले बुद्रूक येथील ११० आणि पातोंडा गावातील १६४ अशा एकूण ४६२ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात खावटी कीटचे वाटप करण्यात आले.