जिल्ह्यातील १९५ गावे खरीप अनुदानापासून वंचित राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 18:59 IST2019-04-20T18:58:35+5:302019-04-20T18:59:03+5:30
नंदुरबार : जून ते सप्टेंबर २०१८ या काळात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने ५० पैश्यांच्या आत पैसवारी असतानाही धडगाव ...

जिल्ह्यातील १९५ गावे खरीप अनुदानापासून वंचित राहणार
नंदुरबार : जून ते सप्टेंबर २०१८ या काळात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने ५० पैश्यांच्या आत पैसवारी असतानाही धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील १९५ गावांना दुष्काळ अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे़ या १९५ गावांमध्ये दुष्काळ जाहिर नसून केवळ दुष्काळसदृश स्थिती असल्याचा अहवाल असल्याने येथे केवळ सवलती लागू होणार आहे़
२०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळीसदृश्य परिस्थिती असल्याने राज्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहिर करण्यात आला होता़ यात नंदुरबार, नवापूर, शहादा आणि तळोेदा या चार तालुक्यांचा समावेश होता़ चारही तालुक्यातील पर्जन्यमान आणि पीककापणी प्रयोगांच्या आधारे शासनाने हा दुष्काळ जाहिर केला होता़ याउलट धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात स्थिती होती़ पाऊस ७५० मिलीमीटरपेक्षा कमी होऊनही येथील पिकांची स्थिती सुरुवातीला काही प्रमाणात ठीक होती़ परंतू नंतर पाऊस न आल्याने येथील स्थिती दयनीय झाली़ याबाबत दोन्ही तालुक्यात पाठपुरावा करण्यात येत होता़ याची दखल घेत नोव्हेंबर २०१८ मध्ये अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा, खापर आणि अक्कलकुवा या तीन मंडळात दुष्काळ घोषित करण्यात आला होता़ यानंतर डिसेंबर अखेरीस अंतिम पैसेवारी घोषित झाल्यानंतर धडगाव ९९ तर अक्कलकुवा तालुक्यातील तीन मंडळातील ९६ गावे ही दुष्काळसदृश असल्याचे समोर आले होते़ यातून लोकोग्राहस्तव शासनाने दुष्काळसदृश घोषित केले होते़ यातून येथे आठ प्रकारच्या सवलती जाहिर झाल्या असल्या तरी या १९५ गावांमध्ये ‘दुष्काळ’ नसल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून देय असलेले खरीप अनुदान मिळणार नसल्याची माहिती आहे़ दुष्काळ आणि दुष्काळसदृश्य या दोन शब्दातील खेळात दुर्गम भागातील शेतकरी भरडला जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे़