एकाच दिवशी १०० जणांना केले क्वॉरंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 11:56 IST2020-05-10T11:56:00+5:302020-05-10T11:56:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन वृद्ध महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर या ...

एकाच दिवशी १०० जणांना केले क्वॉरंटाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन वृद्ध महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर या रुग्णालयातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम दोन दिवस करण्यात आले. जवळपास १०० पेक्षा अधीक जण त्यातून निष्पन्न झाले असून यातील काही अपवाद वगळता सर्वांनाच होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांच्या स्वॅबच्या अहवालाकडे आता लक्ष लागून आहे.
सलग दोन दिवस दोन वृद्ध महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला. यामुळे खळबळ उडाली आहे. रुग्णालय लागलीच सील करण्यात आले आहे. आता या दवाखान्यात आलेले रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती काढून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे.
१०० पेक्षा अधीक जण
रुग्णालयाच्या संपर्कात दोन्ही वृद्ध अॅडमीट असतांना अनेकजण आले होते. आरोग्य विभाग आणि पोलिसांनी गेल्या आठ ते दहा दिवसातील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेले रुग्ण, त्यांचे नातेवाईक, रुग्णांना पहाण्यासाठी आलेले अशा सर्वांची माहिती काढली जात आहे. आतापर्यंत १०० पेक्षा अधीक जण निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्वांना शोधून त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. काहींना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रतिबंधीत व बफर क्षेत्र
पालिका क्षेत्रातील भाग चार मधील अनेक भाग हे प्रतिबंधीत क्षेत्र व बफर झोन जाहीर करण्यात आले आहेत. या ठिकाणी बॅरीकेटींग करण्यात आले आहे. त्यानुसार चार भागात ते विभागण्यात आले आहे. स्वागत कलेक्शन ते अहिल्या देवी विहिर, कुंभारवाडा ते बालाजीवाडापर्यंत तेथून सोनारखुंटपर्यंत, संकटमोचन मंदीर ते गणपती मंदीर व पुढे गंगामाता मंदीरपर्यंत तेथून कंचन हॉटेल व पुढे जुनी जनता बँकेपर्यंतचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र राहणार आहे.
या भागात कुंभारगल्ली, स्वामी नारायण चौक, महाराष्टÑ बँक परिसर, गणपती मंदीर, अंबिका मंडळ परिसर, संतोषीमाता परिसर, अहिल्यादेवी विहिर परिसर हा प्रमुख भाग येतो.
याशिवाय बफर झोनमध्ये या भागाच्या एक किलोमिटर परिसर बफर झोन घोषीत करण्यात आला आहे.
नेहमीप्रमाणे बाजारासाठी गर्दी
प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आल्यानंतर देखील या भागालगतच्या परिसरात बाजारासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यात आली होती. पोलिसांनी बॅरीकेटींग करून देखील नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत होते. बॅरीकेटींगच्या ठिकाणी पोलीस व होमगार्डचे कर्मचारी नेमण्यात आले होते. परंतु त्यांनाही काहीजण जुमानत नसल्याची स्थिती होती. त्यामुळे बंदोबस्तावरील कर्मचारीह हवालदिल झाले होते.
आरोग्य तपासणी करणार
या भागात राहणाºया सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. घरोघरी जावून आरोग्य कर्मचारी तपासणी करीत आहेत. तपासणीसाठी नागरिकांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या भागात पालिकेतर्फे आतापर्यंत तीन वेळा जंतूनाशक फवारणी देखील करण्यात आली आहे. नागरिकांनी या भागात विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे
रुग्णालय आणि पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांनी स्वत:हून आरोग्य तपासणीसाठी पुढे यावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. ताप, सर्दी, खोकलाचे लक्षणे असल्यास तातडीने जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांना प्रतिबंधीत क्षेत्रात बंदोबस्तासाठी तैणात राहावे लागते. अशा वेळी त्यांना कुठलेही संरक्षणाचे साधन नसते. परिणामी आरोग्याचा धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेता विविध सेवाभावी संस्था, संघटना, व्यक्ती आणि पोलीस दलातर्फे देखील कर्मचाºयांना पीपीई किट देण्यात येत आहेत. यामुळे पोलीस वर्तूळात समाधान व्यक्त होत आहे.