नंदुरबार: जेवणावळीतील कथित आचाऱ्याच्या कुटूंबातील पाचजण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 13:28 IST2020-06-14T13:13:31+5:302020-06-14T13:28:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील नऊ जणांसह रनाळे ता़ नंदुरबार येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ शनिवारी रात्री ...

नंदुरबार: जेवणावळीतील कथित आचाऱ्याच्या कुटूंबातील पाचजण पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील नऊ जणांसह रनाळे ता़ नंदुरबार येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालातून १० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते़ यात बहुचर्चित अशा खानसामाच्या संपर्कातील पाच जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत़
धुळे वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जामा मस्जिद भागात राहणाऱ्या ‘त्या’ खानसामाच्या कुटूंबातील तील ३८, २४, ४०, २२, २९ वर्षीय पुरुष, जिल्हा रुग्णालयात कार्यरत ३१ वर्षीय पुरुष तर ४२ वर्षीय महिला, रनाळे येथील पॉझिटिव्ह महिलेच्या कुटूंबातील १ तर नंदुरबार शहरातील लक्ष्मीनगर भागातील ५८ वर्षीय महिला आणि ३१ वर्षीय पुरुष अशा १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ एकाच रात्रीत वाढलेल्या १० रुग्णांमुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ६० झाली आहे़
दरम्यान लक्ष्मीनगर भागातील दोघे पॉझिटिव्ह कल्याण येथील महिला नातेवाईकाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली होतीे़ आई आणि मुलगा दोघेही दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल होते़ त्यांच्या संपर्कातील नातेवाईक कल्याण येथे पॉझिटिव्ह आली आहे़ जामा मशिद भागातील पाच जणांच्या संपर्कातील तसेच रनाळे येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा प्रशासन शोध घेत आहे़ खानसामाच्या संपर्कातील थेट पाच जण पॉझिटिव्ह आल्याने चर्चेला उधाण आले आहे़
नागरिकांकडून दक्षता व सतर्कता बाळगून उपाययोजना करुनच बाहेर पडावे तसेच लक्षणे दिसून आल्यानंतर तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे असे नंदुरबार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ जे़एच़ तडवी यांनी कळवले आहे़
प्रशासनाकडून जामा मशिद, मण्यार मोहल्ला व लक्ष्मीनगर भागात रविवारी सकाळी फवारणी पूर्ण करण्यात आली आहे़