तुमचा रुग्ण, तुम्हीच आणा इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST2021-04-14T04:16:24+5:302021-04-14T04:16:24+5:30
कोरोनाची दुसरी लाट सर्वांचीच दमछाक करीत आहे. बेड, ऑक्सिजन यासह इंजेक्शनच्या तुटवड्याने सर्वचजण हैराण झाले आहेत. प्रशासन शर्थीचे प्रयत्न ...

तुमचा रुग्ण, तुम्हीच आणा इंजेक्शन
कोरोनाची दुसरी लाट सर्वांचीच दमछाक करीत आहे. बेड, ऑक्सिजन यासह इंजेक्शनच्या तुटवड्याने सर्वचजण हैराण झाले आहेत. प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. परंतु नागरिकांच्या बेफिकीर वृत्तीने कोरोना वाढतच चालला आहे. सिटी स्कॅनचा स्कॉरे ९ च्या पुढे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यांना रेमडेसिविर हे इंजेक्शन द्यावे लागते. परंतु सध्या मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत आहे. त्यामुळे रुग्णालये नातेवाईकांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्यास सांगत होते. नातेवाईक इंजेक्शनच्या शोधात वणवण भटकत आहेत. हा प्रकार थांबवा म्हणून प्रशासनाने ज्या रुग्णालयात रुग्ण असेल तेथील औषध विक्रेत्याने एजन्सीकडे आपली मागणी नोंदवावी अन् संबधित रुग्णाला इंजेक्शन उपलब्ध करून घ्यावे. इतर कुठेही हे इंजेक्शन मिळणार नाही. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांना ते आणायला सांगू नये, असे आदेश काढले होते. परंतु या औषध विक्रेत्यांना मागणीप्रमाणे इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे त्यांनी इंजेक्शन आणण्याची जबाबदारी पुन्हा नातेवाईकांवर ढकलली आहे. नातेवाईक आता शेजारील राज्यात जाऊन इंजेक्शनचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे नांदेडला १४०० रुपयांत मिळणारे हे इंजेक्शन शेजारील राज्यात मात्र पाच हजार रुपयात मिळत आहे.