बाबांसारखे पोलीस, डॉक्टर होणार का; मुले म्हणतात नको रे बाबा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:18 IST2021-05-18T04:18:53+5:302021-05-18T04:18:53+5:30
नांदेड : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाची महामारी सुरू आहे. त्याचा सर्वाधिक ताण फ्रंटलाइन वर्करवर पडत आहे. त्यातही पोलीस ...

बाबांसारखे पोलीस, डॉक्टर होणार का; मुले म्हणतात नको रे बाबा !
नांदेड : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाची महामारी सुरू आहे. त्याचा सर्वाधिक ताण फ्रंटलाइन वर्करवर पडत आहे. त्यातही पोलीस आणि आरोग्य विभागातील कर्मचारी तर अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे अनेकांना मानसिक आजाराने पछाडले आहे. घरातील लहान मुलांपासून गेल्या अनेक महिन्यांपासून ते विलगीकरणात राहत आहेत. हे सर्व उघड्या डोळ्याने त्यांची चिमुकले रोज पाहत आहेत. त्यामुळे यापूर्वी बाबांसारखे पोलीस आणि डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त करणारी चिमुकली आता मात्र नाके मुरडत आहेत. कोरोना असेल तर नको रे बाबा, अशी प्रतिक्रिया या चिमुकल्यांनी दिली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून डॉक्टर आणि पोलिसांना आपल्या कुटुंबाला वेळ देता आला नाही. कुठे बाहेर फिरायलाही जाता येत नाही. शाळाही बंदच आहेत. त्यामुळे घरातच कोंडून घेतलेली ही चिमुकली आता कंटाळली आहेत.
गेल्या दीड वर्षापासून डॉक्टर आणि पोलीस हे कर्तव्यावर आहेत. आपल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेकांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. घरातील लहान मुलांच्या मनावर याचा खोलवर परिणाम होत आहे. त्यात शाळा, क्लासेस बंद असल्यामुळे मित्र-मैत्रिणींना भेटून मनावरील ताण हलका होण्यासही मदत मिळत नाही. अशा परिस्थितीत लहान मुलांचे मानसिक स्वास्थ बिघडत चालले आहे.
डॉ.रामेश्वर बोले, मानसोपचार तज्ज्ञ
बाबांसारखे पोलीस व्हायची इच्छा होती; परंतु आता कोरोनामुळे बाबांपासून दूर आहे. गेल्या वर्षभरापासून बाबांसोबत बसून जेवणही करता आले नाही. त्यामुळे कोरोनासारखा आजार नसेल तर पोलीस दलात नोकरी करणे नकोच, असे वाटत आहे.
योगिता कांबळे, पाल्य
बाबा सारखे ड्युटीवरच राहत आहेत. कधी येतात अन् कधी जातात हे कळतच नाही. सारखे चिडचिड करीत राहतात. आईही सांगते पोलिसांना अधिक काम असते म्हणून. त्यामुळे एवढ्या ताणतणावात नोकरी करणे आवडणार नाही.
सुजय टाक, पोलीस पाल्य
बाबांसारखे पोलीस व्हायला आवडेल; पण मोठा अधिकारी झालो पाहिजे. तरच पोलिसांची नोकरी करेल; पण कोरोनासारखी महामारी असेल तर खूप त्रास होतो. बाबांची तब्येतही आता खालावत आहे. त्यामुळे पोलिसाची नोकरी करावी का नाही, असा प्रश्न आहे.
प्रग्यान दळवी, पोलीस पाल्य
गेल्या दीड वर्षापासून बाबा आमच्यापासून वेगळ्या खोलीत राहत आहेत. आम्ही दुरूनच त्यांना पाहत आहोत. जवळ आले तर कोरोना होईल, अशी भीती आहे. त्यामुळे कोरोनासारख्या आजारात डॉक्टरकी नकोच, असे वाटते; पण बाबांकडे पाहून अभिमानही वाटतो.
श्रीजय कुलकर्णी, डॉक्टर पाल्य
कोरोनामुळे बाबा दिवसभर रुग्णालयातच असतात. रात्रीबेरात्री झोपेतून उठून त्यांना जावे लागते. त्यामुळे आमची आणि त्यांची भेटच होत नाही. कोरोना कधी संपेल माहीत नाही; पण या काळात डॉक्टर व्हायला कुणालाच आवडणार नाही.
प्रदीप बोडखे, डॉक्टर पाल्य
कोरोना असो किंवा अन्य कोणतीही महामारी. डॉक्टरांनी रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. त्यामुळे कोणत्याही संकटात डॉक्टर होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करणार आहे. बाबांसारखीच रुग्णसेवा देण्याचे काम करणार आहे; पण डॉक्टरांचे होणारे मृत्यू पाहून त्रास होतो.
तेजस जोशी, डॉक्टर पाल्य