बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय, शासन विचारात, विद्यार्थी संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:20 IST2021-05-25T04:20:36+5:302021-05-25T04:20:36+5:30
कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर बारावीच्या परीक्षा घेण्यासोबतच इतर कोणते उपाय उपलब्ध आहेत, याची माहिती शिक्षणतज्ज्ञांकडून घेतली जात आहे. राज्य ...

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय, शासन विचारात, विद्यार्थी संभ्रमात
कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर बारावीच्या परीक्षा घेण्यासोबतच इतर कोणते उपाय उपलब्ध आहेत, याची माहिती शिक्षणतज्ज्ञांकडून घेतली जात आहे. राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थीही आता परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयार नाहीत. त्यातच कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केल्यास अशा परिस्थितीत परीक्षा कशा देणार, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांसमोर निर्माण झाला आहे. तसेच बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही, त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे. मात्र आता विद्यार्थ्यांची परीक्षेला सामोरे जाण्याची तयारीही राहिली नाही.
चौकट-
काय असू शकतो पर्याय
१. शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा केल्यापासून विद्यार्थी अभ्यासापासून दूर गेले आहेत, तर दुसरीकडे बारावीचे विद्यार्थी परीक्षा होणार की नाही, या संभ्रमात आहेत. त्यातच आता कोरोनानंतर म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल भाकीत करण्यात येत आहे. अशा वेळी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात शासनाने ऑनलाइन परीक्षेचे धोरण राबवावे, असे वाटते. - शिवा कांबळे, शिक्षणतज्ज्ञ
२. बारावी बाेर्ड परीक्षा असल्यामुळे ती व्हायलाच हवी. तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरक्षित अशा प्रकारची परीक्षा घेता येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाची योग्य वेळेत मांडणी करून त्यावर यश मिळविले पाहिजे. बारावी बाेर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या उच्च शिक्षणाची दिशा समजेल. अशा संकटकाळात वैद्यकीय पात्रता पूर्वपरीक्षा यशस्वीपणे पार पडली. त्याच पद्धतीने बारावी बोर्ड परीक्षा व्हावी. - प्रा. धाराशिव व्ही. शिराळे, शिक्षणतज्ज्ञ
३. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा हा अविभाज्य भाग आहे. दहावीच्या परीक्षेचे पूर्वनियोजन केलेले असते तर दहावीची परीक्षासुद्धा घेता आली असती. मात्र आता बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना कोणतीही बाधा होऊ नये, यासाठी ऑनलाइन परीक्षेचे नियोजन करावे, शासनाने कोणताही निर्णय लवकर घ्यावा, ज्यामुळे विद्यार्थी व पालकांची संभ्रमावस्था कमी होईल. - बालासाहेब कच्छवे, शिक्षणतज्ज्ञ
चौकट-विद्यार्थी संभ्रमात
१. मागील वर्षभरापासून बारावीच्या अभ्यासक्रमाच्या बाबतीत संभ्रम होता. ऑनलाइन शिक्षणामुळे बारावीच्या अभ्यासक्रमाची ओळखच झाली नाही. त्यात कशी तरी तयारी केली होती. मात्र आता परीक्षा कधी होणार, होणार की नाही, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. - रक्षा इंगळे, विद्यार्थिनी
२. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखविण्यात येत आहे. त्यातच आता परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यास परीक्षा मनमोकळ्या मन:स्थितीत देता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षित राहतील, यादृष्टीने निर्णय घेतला जावा. - दिव्या दाढेल, विद्यार्थिनी
३. शासनाने कोणताही निर्णय घ्यावा, पण तो लवकर घ्यावा, मागील दोन महिन्यांपासून विद्यार्थी अभ्यासापासून दूर गेले आहेत. आता परीक्षा घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ दिला पाहिजे. - आकाश कवडे, विद्यार्थी