काँग्रेस एकत्र होऊन महायुतीचा फाॅर्म्युला करण्याचा प्रयत्न करून तालुक्यात
सर्वाधिक ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात घेणार असल्याचे आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर म्हणाले. ते ३० डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तर बिनविरोध काढणाऱ्या ग्रामपंचायतीला पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकाराने जास्तीत जास्त निधी मंजूर करून देणार असल्याचे जाहीर केले. तर ज्येष्ठ नेते शेषराव चव्हाण यांनी बाऱ्हाळी व सावरगाव पि. जि.प. गटातील बिनरोध निघालेल्या ग्रामपंचायतीला वैयक्तिकरीत्या प्रत्येकी २१ हजार रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सहकारी, प्रमुख कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत; पण ज्या ठिकाणी निवडणुका बिनविरोध होऊ शकल्या नाहीत. अशा ठिकाणी काँग्रेस पक्ष व सेना, रास्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षाच्या सहकार्याने तसेच गावपातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधून एकजुटीने व मजबुतीने काँग्रेस पक्ष निवडणुका लढविणार असल्याचे सांगितले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुखेड- कंधार विधानसभा मतदारसंघातील रस्ते बांधकामासाठी अर्थसंकल्पामध्ये ३७.०० कोटी रुपये व नाबार्डअंतर्गत पूल उभारण्यासाठी २६.०० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. लेंडी प्रकल्पग्रस्तांना मावेजा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. तसेच लेंडी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जास्तीचा निधी मंजूर करावा. याबाबतचे निवेदन राज्याचे जलसंपदामंत्री मा.ना.श्री. जयंत पाटील यांना दिले असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगितले.
शासनाच्या २५ /१५ लेखाशीर्षकामधून ग्रामपंचायतीस मोठा निधी मिळवून दिला जाणार आहे. तर मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामीण भागातील रस्ते, नाली, शाळा खोली, आरोग्य सेवा सुविधा, घरकुल इत्यादी भौतिक सुविधा आणि अंगणवाडी मंजूर करण्यासाठी शासनाकडे आणि जिल्हा परिषदेकडे जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील, पर्यायाने विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मा.आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी दिली.
यावेळी माजी जि. प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, नगराध्यक्ष बाबूराव देबडवार, ज्येष्ठ नेते शेषराव चव्हाण, सुभाष पाटील दापकेकर, नंदकुमार मडगूलवार, संतोष बोनलेवाड, दिलीप कोडगिरे, उत्तम अण्णा चौधरी, डाॅ. श्रावण रॅपनवाड अदींची प्रमुख उपस्थिती होती.