लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने टरबूज उत्पादकांना काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:33 IST2021-02-21T04:33:37+5:302021-02-21T04:33:37+5:30
महाराष्ट्रातील काही भागात संचारबंदी व धारा १४४ लागू केल्याने टरबूज व खरबुजाची मागणी मंदावली आहे. यामुळे टरबुजाच्या दरात घट ...

लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने टरबूज उत्पादकांना काळजी
महाराष्ट्रातील काही भागात संचारबंदी व धारा १४४ लागू केल्याने टरबूज व खरबुजाची मागणी मंदावली आहे. यामुळे टरबुजाच्या दरात घट झाली आहे. मागील वर्षात जशी लॉकडाऊनची मर्यादा वाढतच गेल्याने शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसला होता. पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली, तर टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
अर्धापूर तालुक्यात सिंचन सुविधा उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज फळपिकांची लागवड केली आहे, तसेच यावर्षी टरबूज व खरबूज पिकासाठी पोषक वातावरण असल्याने तालुक्यात फळपिकांचे क्षेत्रात वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टरबुजाची लागवड केली होती. ती आता तोडण्यात आली आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी माल खरेदीसाठी येत नसल्याने आणि खरेदी केले तरी कमी दर देत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत .
काही शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टरबुजाची लागवड केली आहे. ती काही दिवसांनंतर तोडणीस येणार आहेत; परंतु दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने देशात किंवा महाराष्ट्रात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकऱ्यांनी धसकी घेतली आहे.
चौकट
गेल्या महिन्यात टरबूज पिकाला मोठ्या प्रमाणात मर रोगाची लागण झाली होती. शेतकऱ्यांनी महागडी औषधी वापरून मर रोगाला आटोक्यात आणले, तर काही शेतकऱ्यांचे टरबुजाचे प्लांटचे प्लांट वाळून गेले. मर रोगापासून बचावलेल्या टरबुजाला आता कोरोनाकाळामध्ये दर मिळतो की नाही, हा प्रश्न उभा राहिला आहे. लॉकडाऊन लागले तर टरबूज व खरबूज उत्पादकांना आर्थिक फटका बसणार आहे.