नवीन नांदेडचे पाणी जुन्या नांदेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:23 IST2021-09-15T04:23:10+5:302021-09-15T04:23:10+5:30

चालू वर्षी पावसाळा समाधानकारक झाला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाने सरासरी पार केली आहे. त्याचवेळी यावर्षी पहिल्यांदाच विष्णूपुरी प्रकल्प जुलैमध्ये १०० ...

Water of new Nanded in old Nanded | नवीन नांदेडचे पाणी जुन्या नांदेडात

नवीन नांदेडचे पाणी जुन्या नांदेडात

चालू वर्षी पावसाळा समाधानकारक झाला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाने सरासरी पार केली आहे. त्याचवेळी यावर्षी पहिल्यांदाच विष्णूपुरी प्रकल्प जुलैमध्ये १०० टक्के भरून ओसंडून वाहत आहे. असे असताना नदीकाठच्या असर्जन, कौठा, वसरणी, सिडको-हडको आदी भागांना मात्र सध्या तब्बल ५ ते ६ दिवसाने पाणीपुरवठा होत आहे. आता तर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. गुरू-ता-गद्दी कालावधीत २००८ मध्ये असदवन येथे नवीन नांदेडसाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. या जलशुद्धीकरण केंद्रातून नवीन नांदेड भागात पाणीपुरवठा अपेक्षित होता. मात्र जुन्या नांदेडातील आक्रमक नगरसेवक व तत्कालीन सत्ताधारी आमदारांच्या दबावाखाली नवीन नांदेडचे पाणी जुन्या नांदेडात नेण्यात आले. आता तर जुन्या नांदेडला आधी पाणीपुरवठा आणि नवीन नांदेडला नंतर पाणी अशी परिस्थिती उद्भवली आहे. तांत्रिक कारण सांगून नवीन नांदेडात सध्या ५ ते ६ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. विष्णूपुरी जलाशय ते हडको जलशुद्धीकरण केंद्र व परिसरातील जलवाहिन्यांच्या अडचणीमुळे पाणीपुरवठा पूर्णत: विस्कळीत झाला आहे. सिडको-हडकोसह भीमवाडी परिसरात एकाच वेळी पाणीपुरवठा केला जात असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

संपूर्ण नांदेड शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. आता शहरातील पाणीपुरवठा परिस्थिती काहीअंशी का होईना सुधारली असताना सिडकोतील परिस्थिती मात्र हाताबाहेर जात आहे. चक्क टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. अशा परिस्थितीतही नवीन नांदेडातील सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकांसह विरोधी पक्षाच्या तीन नगरसेवकांनीही चुप्पी साधली आहे. पाणीप्रश्नांवर एकही नगरसेवक आवाज काढत नसल्याने आपल्या अडचणी सोडवतील तरी कोण? असा प्रश्न नवीन नांदेडातील नागरिकांना पडला आहे. उत्तर नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पाणीप्रश्नांवर महापालिकेचे नियोजन नसल्याची टीका केली होती. दक्षिण नांदेडच्या आमदारांनी मात्र अजूनही मौनच बाळगले आहे. सिडको-हडकोसह संपूर्ण नवीन नांदेडातील नागरिकांची अवस्था धरण उशाला अन् कोरड घशाला अशी असतानाही लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्पच आहेत.

Web Title: Water of new Nanded in old Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.