जलयुक्तसाठी जिल्ह्याला सव्वाचार कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:31 IST2018-03-17T00:31:09+5:302018-03-17T00:31:17+5:30
शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील अनेक कामे निधीअभावी रखडली होती. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील बहुतांश कामांचा समावेश असून सदर कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने नांदेड जिल्ह्याला ४.२४ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे. या संदर्भात जलसंधारण मंत्रालयाने १६ मार्च रोजी शासन अध्यादेश काढला आहे.

जलयुक्तसाठी जिल्ह्याला सव्वाचार कोटी रुपये
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील अनेक कामे निधीअभावी रखडली होती. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील बहुतांश कामांचा समावेश असून सदर कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने नांदेड जिल्ह्याला ४.२४ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे. या संदर्भात जलसंधारण मंत्रालयाने १६ मार्च रोजी शासन अध्यादेश काढला आहे.
जिल्ह्यात २०१५ पासून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. मागील तीन वर्षांत या योजनेतून झालेल्या कामांमुळे पाणीपातळीत वाढ झाली असून वैयक्तिक शेततळी, पाझर तलाव आदींकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.यासाठी गावकºयांचा सामूहिक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावातील कामे झपाट्याने झाली. दरम्यान, काही दिवसांपासून निधीअभावी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सुरु केलेली कामे रखडली होती.
आता ही कामे करण्यासाठी शासनाने २०१७-१८ मध्ये नांदेड जिल्ह्यासाठी ४.२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हा निधी वित्त विभागाने जिल्हाधिकारी यांना वितरित केला आहे. ४.२४ कोटींपैकी २.०७ कोटी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेसाठी तर २.१७ कोटी रुपये जलयुक्त शिवार अभियानाकरिता देण्यात आले आहेत.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत नियोजित केलेली कामे करुन उरलेला निधी जलयुक्त शिवारसाठी वापरण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८ मध्ये निवड झालेल्या गावांतील कामांसाठी हा निधी वापरला जाईल. या योजनेतील कामांसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त तर जिल्हाधिकारी हे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
दरम्यान, निवड झालेल्या गावांतील नदी खोलीकरण, तलाव आदी कामे पावसाळा सुरु होण्याअगोदर पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.