वारकरी संप्रदायाचा आता स्वच्छतेसाठी लोकजागर; २६ जानेवारीला ४४ हजार गावांमध्ये निघणार प्रबोधन दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 04:02 PM2019-01-21T16:02:07+5:302019-01-21T16:17:16+5:30

यासाठी विभागनिहाय कीर्तनकारांची टीम तयार करण्यात आली आहे. 

Warkari now known for its cleanliness; Prabodhan Dindi to go to 44 thousand villages from January 26th | वारकरी संप्रदायाचा आता स्वच्छतेसाठी लोकजागर; २६ जानेवारीला ४४ हजार गावांमध्ये निघणार प्रबोधन दिंडी

वारकरी संप्रदायाचा आता स्वच्छतेसाठी लोकजागर; २६ जानेवारीला ४४ हजार गावांमध्ये निघणार प्रबोधन दिंडी

googlenewsNext
ठळक मुद्देस्वच्छता विभाग आणि वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव रुजवणार

- विशाल सोनटक्के

नांदेड : स्वच्छ भारत अभियान आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. अशा स्थितीत कायमस्वरूपी स्वच्छतेसाठी वारकरी संप्रदायानेही पुढाकार घेतला आहे. प्रवचनाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करतानाच त्यांना स्वच्छतेच्या प्रवाहात आणण्यासाठी आता राज्यातील ४४ हजार गावामध्ये प्रबोधनदिंडी बरोबरच लोकजागरही घालण्यात येणार आहे. येत्या २६ जानेवारीपासून राज्यभरात हा उपक्रम राबविण्यात येणार असून यासाठी विभागनिहाय कीर्तनकारांची टीम तयार करण्यात आली आहे. 

स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सुमारे ६० लाख शौचालयांची उभारणी करण्यातही शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला या अभियानांतर्गत  यश मिळालेले आहे. मात्र त्यानंतरही समाजात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीच्या प्रवृत्ती आढळतात. शौचालय उभारुनही त्याचा वापर न करणारीही काही मंडळी आहेत. अशांचे मत परिवर्तन करण्याचा निर्धार स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने केला आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाबाबत विश्वासाचे वातावरण आहे. मागील अनेक पिढ्यांपासून हा संप्रदाय राज्यात मोठ्या नेटाने प्रबोधनाचे कार्य करीत आला आहे. याच संप्रदायाची मदत आता स्वच्छता अभियानासाठी घेण्यात येणार आहेत.

स्वच्छता विभाग आणि वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने राज्यातील ४४ हजार गावामध्ये प्रबोधन दिंडी काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या दिंडीच्या माध्यमातून शाश्वत स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, ओला आणि सुका कचरा वर्गीकरण, शौचालयाचा नियमित वापर आणि प्लास्टिक बंदी व परिसर स्वच्छता याबाबत जागर घालण्यात येणार आहे. यावेळी वारकरी संप्रदायामार्फत स्वच्छतेविषयी जागृती करतानाच कायमस्वरूपी स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांचे मन घडविण्याचे आणि शाळास्तरावर विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजविण्याचे कामही करण्यात येणार आहे. येत्या २६ जानेवारीपासून राज्यभरात या अभियानाला प्रारंभ होणार असून १० फेब्रुवारीपर्यंत हे अभियान चालणार आहे. या अभियानासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून प्रवचनकार, कीर्तनकारांची विभागनिहाय टीम तयार करण्यात आली असून जिल्ह्यातील प्रत्येक गावात जावून ते दींडी, प्रवचन, कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी जनजागृती करणार आहेत. 

लोकजागरासाठी कीर्तनकारांची विभागनिहाय नियुक्ती
२६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या स्वच्छतेच्या लोकजागरासाठी कीर्तनकार, प्रवचनकारांची विभागनिहाय नियुक्ती करण्यात आली असून हे कीर्तनकार आप-आपल्या जिल्ह्यात जावून स्वच्छतेसाठी प्रबोधन करणार आहेत. यासाठी मराठवाडा विभागात हभप नरसिंग किसनराव काकडे, हभप राजकुमार माधवराव फावडे, हभप डॉ. सय्यद जब्बार पटेल यांच्यासह हभप रमाकांत गोविंदराव भोसले (लातूर), विष्णू महाराज सुरवसे (बीड), संजय महाराज सूर्यवंशी (औरंगाबाद), ज्ञानेश्वर रामकिशन दाभाडे (परभणी), अनिरुद्ध यशवंत जोशी (नांदेड), विलासराव किसन देशमुख (जालना), श्रीहरी महाराज चवरे (उस्मानाबाद), फुलाजी महाराज शेळके (हिंगोली) अशी १२ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.  याच पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रासाठी ५, कोकण विभागासाठी ९, नाशिक विभागासाठी ५, अमरावती ८ तर नागपूर विभागासाठी ५ अशा ४४ प्रबोधनकारांची राज्यभरासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

१९ जिल्ह्यात झाल्या बैठका
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात स्वच्छतेच्या महाजागराचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी हभप शामसुंदर सोन्नर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील १९ जिल्ह्यात नियोजन बैठका घेण्यात आल्या आहेत. यासाठी हभप नरहरीबुवा चौधरी, हभप चैतन्यमहाराज कबीरबुवा, गगनराज पाटील, हभप सर्जेराव महाराज देशमुख, विठ्ठल पाटील आदींनी जिल्हानिहाय बैठकीत मार्गदर्शन केले असून २६ जानेवारीपासून राज्यभर कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे. 
- अरुण रसाळ, विभागीय समन्वयक, स्वच्छता विभाग, मुंबई

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव रुजवणार
हरि कीर्तनाची परंपरा महाराष्ट्राबरोबरच देशात प्राचिनकाळापासून आहे. गावा-गावात प्रवचन आणि कीर्तनाचे आयोजन अनेक वर्षापासून होत आलेले आहे. टाळ-मृदुंगाच्या साथीत हरिनामाबरोबरच लोकशिक्षण आणि प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून कीर्तन सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळेच स्वच्छतेबाबत जनजागरण करण्यासाठी आता वारकरी संप्रदायाची मदत घेण्यात आली आहे. विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयीच्या जाणीवा रुजविण्याचा या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे.
- अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., नांदेड.

Web Title: Warkari now known for its cleanliness; Prabodhan Dindi to go to 44 thousand villages from January 26th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.