अनुदानित बियाणांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा; बियाणे मिळणार का रे भाऊ? नोंदणी ५६ हजारावर, मिळणार साडेतीन हजारांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST2021-05-29T04:15:01+5:302021-05-29T04:15:01+5:30

नांदेड जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढले असून जवळपास साडेआठ लाख हेक्टरहून अधिक जमिनीवर खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यात सोयाबीनचा ...

Waiting for subsidized seeds to farmers; Will you get seeds, brother? Registration at 56 thousand, will benefit three and a half thousand | अनुदानित बियाणांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा; बियाणे मिळणार का रे भाऊ? नोंदणी ५६ हजारावर, मिळणार साडेतीन हजारांना लाभ

अनुदानित बियाणांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा; बियाणे मिळणार का रे भाऊ? नोंदणी ५६ हजारावर, मिळणार साडेतीन हजारांना लाभ

नांदेड जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढले असून जवळपास साडेआठ लाख हेक्टरहून अधिक जमिनीवर खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असतो. परंतु, गतवर्षी सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा अनुदानित बियाणे खरेदीसाठी नोंदणी केली आहे. अनुदानित बियाणे अत्यल्प दराने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. परंतु, ते सर्वांना उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. आजघडीला नांदेड जिल्ह्यात ५६ हजार ३५८ शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणे खरेदीसाठी नोंदणी केली आहे. परंतु, शुक्रवारी काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये केवळ ३ हजार ७०० जणांचीच निवड करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित ५० हजारावर शेतकऱ्यांना बियाणे मिळणार की नाही, असा प्रश्न नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पडला आहे.

जिल्ह्यात ५६ हजार अर्ज

नांदेड जिल्ह्यात अनुदानित बियाणे खरेदी करण्यासाठी ५६ हजार ३५८ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये सर्वाधिक ९ हजार ६५० अर्ज मुखेड तालुक्यातून आहेत. त्याचबरोबर अर्धापूर तालुक्यातून ७०६, भोकर ३०४६, बिलोली- ३०८८, देगलूर - ५५८९, धर्माबाद - १४५३, हदगाव - ६२१८, हिमायतनगर - १५९८, कंधार - ४०७०, किनवट - ३६८६, लोहा - ५१३२, माहुर - २९९४, मुदखेड - ८६५, नायगाव - ५५१९, नांदेड - ११०४, तर उमरी तालुक्यातून ८७४ अर्ज आले आहेत.

निवड झालेल्यांना येणार एसएमएस

नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणे मिळावे म्हणून नोंदणी केली आहे. परंतु, प्रत्येक शेतकऱ्यास हे बियाणे मिळणार नसून केवळ लॉटरी पद्धतीने नावे निघालेल्या शेतकऱ्यांनाच बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये सोयाबीन, उडीद आणि तुरीचेच बियाणे उपलब्ध होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. सर्वाधिक सोयाबीन बियाणास मागणी आहे.

निवड केलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून एसएमस पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना महाबीजचे बियाणे खरेदी करता येणार आहे. जवळपास १२०० रुपये प्रति क्विंटल या दराने सदर बियाणे मिळणार आहे. एसएमएस आला तरच आपली लॉटरी लागली, असे शेतकऱ्यांनी समजावे.

सोयाबीनसाठी सर्वाधिक अर्ज

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून अत्यल्प दराने अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. परंतु, शेतकऱ्यांची निवड खूप कमी केली जात असल्याने बहुतांश गावांत अनुदानित बियाणे एकाही शेतकऱ्यास मिळत नाही, असेही चित्र आहे. कडधान्य, गळीतधान्य आणि पौष्टिक तृणधान्याची बियाणे उपलब्ध करून दिली जात आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यात पुढील आठ दिवसात सोयाबीन, उडीद आणि तुरीचे बियाणे देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अनुदानित बियाणे मिळावे म्हणून अर्ज केला आहे. परंतु, अद्याप तरी कोणताही एसएमएस आलेला नाही. या ठिकाणी ओळखीने अथवा राजकीय नेत्यांच्या शिफारशीने बियाणे दिले जाते. त्यामुळे आम्हाला बियाणे उपलब्ध होईल की नाही, अशी शंका आहे.

- तुकाराम सूर्यवंशी, शेतकरी.

मागील चार वर्षांपासून नियमितपणे अर्ज करून नोंदणी करतो. परंतु, आजपर्यंत अनुदानित बियाणे मिळाले नाही. खासगी व्यापाऱ्यांकडून घेतलेले बियाणे बोगस निघाल्याने शासनाच्या महाबीजचे बियाणे खरेदी करण्याचा विचार आहे. परंतु, लॉटरीमध्ये नाव लागले तरच. अन्यथा घरगुती बियाणांची पेरणी करून पीक घ्यावे लागणार आहे.

- पुरभाजी कदम, शेतकरी.

Web Title: Waiting for subsidized seeds to farmers; Will you get seeds, brother? Registration at 56 thousand, will benefit three and a half thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.