दोन दिवसांत किनवट आगाराच्या अवघ्या दहा बसेस धावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:17 IST2021-04-13T04:17:01+5:302021-04-13T04:17:01+5:30
जिल्ह्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट आगाराला दररोज पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. कोरोना या महामारी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहा ...

दोन दिवसांत किनवट आगाराच्या अवघ्या दहा बसेस धावल्या
जिल्ह्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट आगाराला दररोज पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. कोरोना या महामारी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहा दिवस संपूर्ण गाड्याचे चाक बंद झाल्याने या कालावधीत या आगाराला अर्ध्या कोटींचा फटका बसला आहे. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्यानंतर कसेबसे उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली. मात्र, वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी यांनी पुन्हा ‘ब्रेक द चेन’ लागू केला आहे. त्यामुळे गाड्यांना प्रवासीच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच शनिवारी व रविवारी पूर्णतः दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडले नाही. या दोन दिवसांत ४७ पैकी केवळ दहाच बसेस धावल्या आहेत. या दहा बसेसच्या ५२ फेऱ्या झाल्या असून, ८ हजार ५०० किलोमीटर धावल्या आहेत. यापोटी केवळ १ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न किनवट आगाराला मिळाले आहे.
.कोट..................
लग्न सराईत परिवहन महामंडळाला चांगले दिवस असतात. या कालावधीत एसटीला चांगले उत्पन्न मिळते. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे एसटीला मोठा फटका सोसावा लागला. त्यातच ‘ब्रेक द चेन’चा किनवट आगाराला मोठा फटका बसला असून, या दोन दिवसांत गाड्या रिकाम्याच धावल्या आहेत.
- मिलिंद सोनाळे, आगार प्रमुख, किनवट
एकूण बसेस ४७
धावल्या बसेस १०
किलोमीटर ८५००
उत्पन्न १५००००
फेऱ्या ५२
एसटीकडून नियमांचे पालन
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या नियमांचे महामंडळाकडून पालन करण्यात येत आहे. सध्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रवाशांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. मात्र, वरिष्ठांच्या सूचनेनुसार आवश्यकता आहे. तिथे गाड्या सोडल्या जात आहेत. प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्यात येत असल्याचेही एसटीच्या वतीने सांगण्यात आले.