जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज जिल्ह्यात वृक्षलागवड मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST2021-06-05T04:14:11+5:302021-06-05T04:14:11+5:30
कोविडच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, विविध कार्यालयाच्या जागा व गावात दुतर्फा वृक्ष ...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज जिल्ह्यात वृक्षलागवड मोहीम
कोविडच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, विविध कार्यालयाच्या जागा व गावात दुतर्फा वृक्ष लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यात वृक्षलागवडीची मोहीम पावसाळी हंगामात हाती घेण्यात आली आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीने उपलब्ध मोकळ्या जागेत, शेतात, बांधावर, पडीक जमिनीवर, रस्ता दुतर्फा, नदी, नाल्याच्या काठावर वृक्ष लावगड करण्यात यावी. या वृक्षलागवडीच्या लोकचळवळीत नागरिकांनी सहभागी होऊन निसर्गाचे संवर्धन करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
या मोहिमेंतर्गत प्रत्येक व्यक्तींने किमान ३ झाडे लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्ती ३ वृक्ष, याप्रमाणे जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण भागात सुमारे ७२ लाख ६६ हजार १२६ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. यासाठी तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांच्या स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. या पावसाळ्यात हे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. याशिवाय मियावाकी पद्धतीने गावातील मोकळ्या जागा, शासकीय कार्यालय परिसरात एक हजार प्लॉटमध्ये झाडे लावण्यात येणार आहेत, तरी तालुका स्तरावरील सर्व कार्यालय प्रमुखांनी वृक्षलागवडीचे नियोजन करून, वृक्षलागवडीचा शुभारंभ करताना, शासनाच्या कोविड १९ सूचनांचे पालन करण्यात यावे. या वृक्षलागवडीच्या मोहिमेत लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक-युवती, अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन वृक्ष लागवडीची मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.