पालकमंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नातून बंजारा समाजाचे विविध प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:18 IST2021-04-27T04:18:38+5:302021-04-27T04:18:38+5:30
कै. वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा नांदेड शहरात व्हावा, श्रीक्षेत्र माहूरजवळ असलेल्या सेवादासनगर येथील पैनगंगा नदीवर स्नानघाट उभारावा व ...

पालकमंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नातून बंजारा समाजाचे विविध प्रश्न मार्गी
कै. वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा नांदेड शहरात व्हावा, श्रीक्षेत्र माहूरजवळ असलेल्या सेवादासनगर येथील पैनगंगा नदीवर स्नानघाट उभारावा व भोकर येथे मिनी नगारा भवन निर्माण करावे अशा बंजारा समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या होत्या. या संदर्भात बंजारा समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शासनस्तरावर अनेकदा प्रयत्न केला होता.
समाजाच्या या सर्व मागण्या रास्त असून, या मागण्या सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असा शब्द पालकमंत्री चव्हाण यांनी दिला होता. त्यानुसार नांदेड शहरात कै. वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या प्रक्रियेस गती दिली असून, पुतळ्याचे काम मार्गी लागले आहे. महापालिकेच्यावतीने २३ एप्रिलला कै. वसंतराव नाईक यांच्या नऊ फुटी ब्रांझ धातूचा पूर्णाकृती पुतळा निर्मितीची निविदाही प्रसिद्ध झाली आहे.
माहूरजवळील सेवादासनगर येथील पैनगंगा नदीकाठी स्नानघाटाची निर्मिती व मुख्य रस्त्यापासून २२० मीटर लांबीचा सीसी रस्ता निर्माण करण्याचे काम बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. या संदर्भात दीक्षागुरू संत प्रेमसिंगजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत २५ रोजी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली. यावेळी बंजारा समाजाचे नेते व काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, युवक काँग्रेसचे भोकर विधानसभा सरचिटणीस विनोद चव्हाण यांची उपस्थिती होती.
पोहरादेवी येथील नंगारा भवनच्या धर्तीवर भोकर येथे नऊ हजार स्केअर फूट जागेवर मिनी नंगारा भवन उभारण्यात येणार आहे. या मिनी नंगारा भवनचे डिझाईन तयार करण्याचे आदेश पालकमंत्री चव्हाण यांनी दिले आहेत. त्याबद्दल बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते शेषेराव चव्हाण, जि. प.चे समाजकल्याण सभापती अॅड. रामराव नाईक, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, कैलास राठोड, विनोद चव्हाण, साहेबराव राठोड, गणेश राठोड, गुलाब नाईक, अप्पाराव राठोड, उत्तमराव चव्हाण, वसंत पवार, वसंत जाधव, श्रीनिवास जाधव, आदींनी पालकमंत्री चव्हाण यांचे आभार मानले आहेत.