किनवट : मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या धावत्या नंदीग्राम एक्स्प्रेसमधून पडल्याने एका ३५ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना २ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता किनवट रेल्वे स्टेशन येथे घडली़ मयत शिक्षिकेचे नाव तृप्ती तेहरा असे आहे़गाडीपुरा, नांदेड येथील तृप्ती तेहरा या लक्ष्मीनगर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होत्या. २ एप्रिल रोजी नांदेडहून किनवटला येत असताना चालत्या रेल्वेतून उतरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यात त्या रेल्वेस्थानकात पडून गंभीर जखमी झाल्या.तात्काळ त्यांना गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ परंतु, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले़ नांदेड येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना दुपारी त्यांचे निधन झाले़ पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली. तपास रेल्वे पोहेकॉ राजू राठोड, अतीश मोहिते, नरेंद्र कारमुंगे हे करीत आहेत़ दरम्यान या घटनेमुळे जिल्हाच्या शैक्षणिक वर्तुळातून दु:ख व्यक्त करण्यात येते होते़ विविध शिक्षक संघटनांनी तृप्ती तेहरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन आपल्या भावना व्यक्त केल्या़
रेल्वेतून पडल्याने शिक्षिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:28 IST