हदगाव : येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षिकेचा मध्यान भोजन करताना ठसका लागून मृत्यू झाला. ही घटना १३ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता हदगाव येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. मयत शिक्षिकेचे मीना देवराव लोणे (वय ५०) असे नाव आहे.
सध्या दहावीच्या परीक्षा सुरु आहेत. परिक्षा केंद्रावर ज्या शिक्षकांच्या ड्युटी आहेत, त्यांना परिक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक केले आहे. मीना लोणे या जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेवर कार्यरत होत्या. माहूरच्या आयटीआय कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र लोणे यांच्या त्या पत्नी होत.
परंतु त्यांच्यापासून त्या विभक्त झाल्या होत्या. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. १३ मार्च रोजी सकाळी इतर महिलांसोबत भोजन करीत असतानाच त्यांना ठसका लागला, या ठसक्यातच मीना लोणे यांचा जीव गेला. हदगाव येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केले. परंतु त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.