प्रॉपर्टी गोळा करणाऱ्या प्रवीण दरेकरांची बोलण्याची पात्रता नाही, सुषमा अंधारे यांची टीका
By शिवराज बिचेवार | Updated: August 30, 2023 17:14 IST2023-08-30T17:10:40+5:302023-08-30T17:14:15+5:30
राज्य परदेशी गुंतवणुकीत एक क्रमांकावर असल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्याचाही अंधारे यांनी समाचार घेतला.

प्रॉपर्टी गोळा करणाऱ्या प्रवीण दरेकरांची बोलण्याची पात्रता नाही, सुषमा अंधारे यांची टीका
नांदेड- ज्या दरेकरांना फक्त अन् फक्त मुंबईतील प्रॉपर्टी गोळा करण्यापासून वेळ मिळत नाही, त्यांची आमच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याची पात्रता नाही. अशा शब्दात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली. त्या नांदेड जिल्ह्यात एका व्याख्यानासाठी आल्या होत्या.
यावेळी अंधारे म्हणाल्या, कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी राज्य उत्तमप्रकारे चालविले. परंतु भाजपशासित उत्तर प्रदेश सारखी महाराष्ट्रात प्रेते नदीत वाहिली नाहीत. त्यामुळे भक्तांनी विकासाच्या नावाने गप्पा मारू नये. राज्य परदेशी गुंतवणुकीत एक क्रमांकावर असल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्याचाही अंधारे यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, फडणवीस अजूनही वास्तवात येत नाहीत. हे भाजपाच्या सर्वच लोकांचे आहे. पंतप्रधान, उपमुख्यमंत्री फडणवीस या सर्वांना ही सवय लागली आहे. उद्योग बाहेर जात असताना कोणत्या गुंतवणुकीच्या बाता हे लोक करीत आहेत. सध्या शिंदे सरकारकडून माणसांना ओढण्याचे काम सुरु आहे. आमच्याकडे प्रवेश केल्यास तुला एक, दोन कोटींचे कंत्राट देतो असे आमिष दाखविले जात आहे. त्यांना निधीही भरपूर मिळत आहे. परंतु जनमत पैशाने येत नसते. या सरकारबद्दल नकारात्मकता वाढत आहे असेही त्या म्हणाल्या.
शेलारांच्या कानामागून आले अन् शहाणे झाले
आशिष शेलार यांचाही अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतला. शेलार हे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना आहेत. त्यांनी एवढाच विचार करावा की, फडणवीस यांनी त्यांना एवढे मर्यादित का केले?, कानामागून आलेले दरेकर, प्रसाद लाड, कुंभोज यांना महत्त्व दिले जात आहे. आपल्याला काहीच मिळत नाही. त्यामुळे आपली मरमर मी समजू शकते असेही अंधारे म्हणाल्या.