नव्या संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत कलंबर कारखान्याचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:19 IST2021-04-28T04:19:20+5:302021-04-28T04:19:20+5:30
जिल्हा बँकेची सत्ताकमान पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हाती आल्यानंतर बँकेच्या हिताचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागून नवे संचालक मंडळ ...

नव्या संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत कलंबर कारखान्याचा विषय
जिल्हा बँकेची सत्ताकमान पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हाती आल्यानंतर बँकेच्या हिताचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागून नवे संचालक मंडळ थकबाकी वसुलीला गती देण्याबरोबर साखर कारखान्यांच्या विक्रीच्या विषयातही हात घालतील, अशी चर्चा आहे. दहा दिवसांपूर्वी बँकेच्या नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर संचालक मंडळाची पहिली सभा अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत ४ मे रोजी होत आहे. बँकेच्या उपविधीनुसार वेगवेगळ्या समित्या या सभेत गठीत केल्या जाणार आहेत, असे सांगितले जाते.
बँकेत काँग्रेस आघाडीचे संपूर्ण वर्चस्व असल्याने विरोधी बाकावर बसलेल्या भाजपाच्या संचालकांना समित्यावर स्थान देताना किती महत्त्व दिले जाईल, हे बैठकीनंतर समोर येणार आहे. कमी महत्त्वाच्या समित्यांमध्ये त्यांना सामावून घेतल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच राहणार नाही. दरम्यान, नव्या संचालक मंडळाच्या पहिल्या सभेसमोर कलंबर सहकारी साखर कारखान्याचा विषय सभापटलवार गाजण्याची शक्यता आहे. या कारखान्याच्या विक्रीतून काही प्रमाणात बँकेची थकीत रक्कम वसूल होण्याची शक्यता असताना राजकीय हस्तक्षेप व संचालक मंडळाच्या धरसोडपणामुळे हा विषय प्रलंबित राहून बँकेचे आर्थिक नुकसान होत आहे.
करोडो रुपयांचे कर्ज डोक्यावर असलेल्या कलंबर साखर कारखान्याच्या विक्रीसाठी अनेकदा निविदा मागविल्यानंतरही त्याला प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी हातावरची रक्कम कमी करून हा कारखाना विक्री करण्याची वेळ बँकेवर आली होती. एका उद्योगाने हा कारखाना खरेदी केल्यानंतर त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याने ही विक्री प्रक्रिया थांबली, कारखाना विक्रीचा विषय मंत्रालयापासून ते न्यायालयापर्यंत पोहोचला, पण त्यातून मार्ग निघण्याऐवजी प्रत्येकवेळी काहीतरी वेगळाच पेच निर्माण व्हायचा. गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित असून, ४ मे रोजी होणाऱ्या संचालक मंडळासमोर हा विषय ठेवण्यात आल्याने सभेत या विषयावर काय चर्चा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कलंबरच्या विक्रीचा विषय अनेकदा संचालक मंडळासमोर आला असला तरी, त्याबाबत कुठलीही ठोस कृती झाली नाही. त्यामुळे नवा संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत कलंबरच्या विषयाचा सोक्षमोक्ष लागेल की पूर्वीप्रमाणेच चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.