कंधार आगाराच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक, धर्मापुरी बसस्थानकावरील घटना
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: September 14, 2023 00:47 IST2023-09-14T00:46:15+5:302023-09-14T00:47:21+5:30
एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

कंधार आगाराच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक, धर्मापुरी बसस्थानकावरील घटना
गोविंद शिंदे -
बारुळ (जि. नांदेड) - कंधार आगाराची एसटी बस क्रमांक एम. एच. २० बी. एल. १९०८ ही कंधार-बारूळ मार्गे रात्रपाळी मुक्कामी नरसी येथे जात असताना धर्मापुरी बसस्थानक फाट्यावर एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत अज्ञातांनी एसटी बसवर दगडफेक केली. ही घटना बुधवार १३ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान घडली. प्रवासी आधीच उतरल्याने या दगडफेकीत कोणीही जखमी झाले नाही. परंतु, एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी सध्या राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची धग नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कायम आहे. कंधार-बारूळ मार्गे बस एम. एच. २० बी. एल. १९०८ ही नरसीला मुक्कामी जात असताना धर्मापुरी फाटा बसस्थानक रस्त्यावर काही अज्ञात व्यक्तींनी बसच्या समोर मोठे दगड व पुलाचे पाईप टाकून दगडफेकीचा वर्षाव केला. या दगडफेकीत बसच्या सर्व काचा फोडण्यात आल्या. बसमधील सर्व प्रवासी दोन किलोमीटर अंतरावरील चिंचोली येथे उतरले होते, त्यामुळे कुठलीही जिवीतहानी झाली नाही. दगडफेकीत चालक- वाहक सुखरूप होते.
याप्रकरणी चालक- वाहक यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गोपाळ इंद्राळे, आगार प्रमुख अभय वाढवे, वाहतूक निरीक्षक जगदीश मटंगे, स.उपनिरीक्षक आर. यू. गणाचार्य, पोलीस आमदार टी एम जुन्ने यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. अज्ञाताविरुद्ध रात्री १०.४५ वाजता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
उपविभागीय पोलिस अधिकारी घटनास्थळी -
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात यांनी रात्री भेट दिली. नांदेड येथून पोलिस अधीक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक येणार असल्याने रात्री उशिरापऱ्यंत आठ ते दहा पोलिसांचा बंदोबस्त घटनास्थळी ठेवण्यात आला होता.