नांदेड : कोरोनामुळे मागील दहा महिन्यांपासून बंद असलेल्या रेल्वे अद्याप सुरू झाल्या नाहीत. मात्र, काही विशेष रेल्वेगाड्या चालू करून प्रवाशांची सोय केली आहे. मात्र, या प्रवासासाठी त्यांना दुप्पट दाम द्यावा लागत आहे. त्यामुळे लाॅकडाऊनमुळे आर्थिक गणित कोलमडलेल्या नागरिकांच्या खिशाला अधिकच झळ बसत आहे.
देशभरातील दळणवळणाचे एकमेव सोयीचे साधन म्हणून रेल्वे गाडीचा उल्लेख केला जातो. ‘गरिबांची रेल्वे’ म्हणूनही ओळखले जाते. परंतु कोरोना महामारीमुळे देशात मार्च २०२० पासून रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. लाॅकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आल्यानंतरही रेल्वेगाड्या अद्याप पूर्ण क्षमतेने सोडण्यात आल्या नाहीत. बस वाहतूक सुरळीत झाली असली तरी रेल्वेचे सेवा अद्याप सर्वसामान्यांना मिळत नाही. अनेक रेल्वेगाड्या बंद असून काही मोजक्या रेल्वे सुरू करून रेल्वे विभागाने त्याचे प्रवासभाडे वाढविले आहे. त्यामुळे प्रवाशांना हा प्रवास महागडा झाला आहे.
चौकट-
जिल्ह्यातंर्गत पूर्वी प्रवास करताना आम्ही पूर्णा-परळी, आदिलाबाद-पूर्णा या पॅसेंजर गाड्यांनी प्रवास करत होतो. या गाड्याचे तिकीट कमी होते. आणि वेळेप्रमाणे या गाड्यांची सोय होती. मात्र, आता १० महिन्यांपासून सगळे विस्कळीत झाले आहे. पॅसेंजर गाडी सुरू लवकर सुरू करावी- जगन्नाथ लोखंडे, पूर्णा
नांदेड शहरात कामानिमित्त आम्हाला जावे लागते. मात्र, आता कामे खोळंबली असून प्रवास करण्यासाठी रेल्वे मिळत नाहीत तसेच रेल्वेचे भाडेही परवडत नाही. अगोदर आम्ही ४५ रुपयांत नांदेडला येत होतो. आता दीडशे रुपये द्यावे लागतात.
-गणेश पवार, किनवट
चौकट-
नांदेड रेल्वे विभागाने काही ठरावीक विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत. मात्र, नेहमी धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या अद्याप बंदच आहेत. त्यामुळे विशेष गाड्यांचे प्रवास भाडे महागले आहे. नांदेड-किनवट पॅसेंजर गाडीला पूर्वी ४५ रुपये द्यावे लागत असे. मात्र, आता स्पेशल गाडीला १४५ रुपये प्रवास भाडे द्यावे लागत आहे. एकूणच किनवट- नांदेड या अंतरासाठी रेल्वेने तिप्पट दरवाढ केली आहे.त्यामुळे सर्वसामान्यांना हा प्रवास परवडणार नाही. पॅसेंजर गाड्या सोडण्याची मागणी होत आहे.