बोलाचाच भात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:51 IST2018-03-17T23:49:18+5:302018-03-17T23:51:15+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन सातत्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना करीत आहेत. मात्र त्यानंतरही या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. शेतक-यांसाठी राबविण्यात येणा-या अनुदानावरील विहिरीबाबत उमरी तालुक्यात अशीच परिस्थिती आहे. या योजनेतून अवघे ३५ शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

बोलाचाच भात...
बी.व्ही. चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन सातत्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना करीत आहेत. मात्र त्यानंतरही या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. शेतक-यांसाठी राबविण्यात येणा-या अनुदानावरील विहिरीबाबत उमरी तालुक्यात अशीच परिस्थिती आहे. या योजनेतून अवघे ३५ शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत.
राज्य शासनाच्या वतीने डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन ही शेतक-यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना राबविली जाते. सिंचनाचे नियोजित उद्दिष्ट गाठण्याच्या हेतूने ही योजना महत्त्वपूर्ण आहे. मात्र योजनेसाठी घातलेल्या अटी आणि योजनेचा प्रसार, प्रचार योग्य पद्धतीने न झाल्याने ही योजना प्रत्यक्ष कागदावरच असल्याचे उमरीसह अनेक ठिकाणी चित्र आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील कमीत कमी एक एकर जमीन असणा-या शेतक-यांसाठी ही स्वावलंबन योजना आहे़ विहिरीसाठी २़५ लाख रुपये, वीजजोडणीसाठी १० हजारांपर्यंत शासनातर्फे व विद्युत मोटारीसाठी २५ हजारापर्यंत अनुदान असे योजनेचे स्वरूप आहे़ मागासवर्गातील शेतकरी सुद्धा आपली शेती अधिक चांगल्या पद्धतीने मेहनत करून उत्पन्न काढू शकतो़ असे असले तरी एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा झाल्यास शासनाच्या जाचक अटीला सामान्य माणूस कंटाळतो़ या योजनेचेही असेच झाल्याने उमरी तालुक्यात सदर योजनेसाठी शेतकºयांचा फारच कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत आहे़ सबंध उमरी तालुक्यात अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या २० हजार ३५४ तर अनुसूचित जमाती प्रवर्गाची ९ हजार ४३२ एवढी लोकसंख्या आहे़ दोन्ही मिळून ३० हजारांच्या जवळपास लोकसंख्या असताना त्या प्रमाणात योजनेच्या लाभासाठी शेतकरी पुढे आले नाहीत़ या योजनेसाठी ५२ शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज भरले़ कागदपत्रांची अपुरी पूर्तता, त्रुटी आदी कारणांमुळे १७ लोकांचे अर्ज रद्द ठरले तर ३५ अर्ज स्वीकारण्यात आले़ पात्र लाभार्थीमध्ये गोळेगाव, तळेगाव, हस्सा, कावलगुडा बु़, सोमठाणा, बितनाळ, सावरगाव, कळगाव, बोथी, तुराटी, बोळसा खु़, गोरठा, हातणी आदी गावांचा समावेश आहे़ चालू वर्षातील मंजूर ३५ पैकी १५ विहिरींचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे़ यातील ४ विहिरींना पाणी लागले असून इतर विहिरींचे खोलवर काम होताच पाणी लागण्याची अपेक्षा आहे़
योजनेची माहिती प्रत्येक गावात ग्रा़पं़ मार्फत दिली जाते़ ३१ मार्च २०१८ पर्यंत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील विहिरींची सर्व कामे पूर्ण करणे आवश्यक असून त्यासाठी पं़स़ कडे निधी उपलब्ध आहे़ योजनेच्या लाभातून शेतक-यांना दुस-यांकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही व लाभार्थी सक्षम होणार आहे -
शिरीषराव गोरठेकर,
सभापती, पं़स़ उमरी़