यंदा पुन्हा सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात होणार वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST2021-05-01T04:16:42+5:302021-05-01T04:16:42+5:30
नांदेड जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे. यावर्षी कोरोना काळात सोयाबीनला चांगला भाव मिळाला. तसेच ...

यंदा पुन्हा सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात होणार वाढ
नांदेड जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे. यावर्षी कोरोना काळात सोयाबीनला चांगला भाव मिळाला. तसेच पिकाला चांगला उतारा येत असल्याने शेतकरी सोयाबीन पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. मागील पाच वर्षांच्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत आगामी खरीप हंगामात सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कापसाची पेरणी मात्र २ लाख ६० हजार हेक्टरवरून २ लाख ३० हजार हेक्टरवर लागवड होईल. खरीप हंगाम २०२० मध्ये जिल्ह्यात ७ लाख ५९ हजार ४६० हेक्टरवर पेरणी झाली होती. यात ३ लाख ८७ हजार हेक्टरवर सोयाबीन, २ लाख १२ हजार २०० हेक्टरवर कापूस, ७२ हजार ६३ हेक्टरवर तूर, २६ हजार १३६ हेक्टरवर मूग, २७ हजार ७१ हेक्टरवर उडीद, ३१ हजार ४३९ हेक्टरवर खरीप ज्वारी, २ हजार ८७५ हेक्टरवर इतर पिके घेण्यात आली होती. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव यांनी आगामी खरीप हंगामात राखून ठेवलेले सोयाबीन पेरावे, पेरणीपूर्व उगवण क्षमता तपासावी. तसेच शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय सोयाबीनची पेरणी करू नये, असे सांगितले.