थोडक्यात महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST2021-06-05T04:14:14+5:302021-06-05T04:14:14+5:30
नांदेड : भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विहिरीचे पुनर्भरण संकल्पना आणि तंत्रज्ञान या विषयावर वेबिनारचे आयोजन येथील ...

थोडक्यात महत्त्वाचे
नांदेड : भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विहिरीचे पुनर्भरण संकल्पना आणि तंत्रज्ञान या विषयावर वेबिनारचे आयोजन येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने करण्यात आले होते, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांनी दिली. व्याख्यानात भूजल पुरर्भरण विहीर व विंधन विहीर, छतावरील पाऊस आणि संकलन व पुनर्भरण, नांदेड जिल्ह्याची संक्षिप्त माहिती व जलचक्र, पाणी तपासणी व पाणी गुणवत्ता, जलसंधारण उपाययोजना या विषयांचा समावेश होता.
रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी
नांदेड : सिडको भागातील विजयनगर के. १ प्रबुद्ध विहाराकडे जाणाऱ्या मार्गावर ड्रेनेजचे पाणी आल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत असून आरोग्यास धोका होण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून हे घाण पाणी रस्त्यावरून वाहत असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसेनजीत वाघमारे यांनी केली आहे.
प्राणवायू नलिका व प्रणाली तपासणी पूर्ण
नांदेड : जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयातील प्राणवायू नलिका व प्रणाली तपसणी करण्याची जबाबदारी शासकीय तंत्रनिकेतन यांच्याकडे सोपविण्यात आली होती. हे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी, शासकीय तंत्रनिकेतन, आयटीआयचे प्राचार्य यांची समिती गठित केली होती. जिल्ह्यातील ५९ शासकीय व खाजगी कोविड रुग्णालयातील प्राणवायू नलिका व यंत्रणेची तपासणी करण्यात आली.
आस शिक्षण संघटनेची मागणी
नांदेड : भविष्य निर्वाह निधी विवरणपत्राच्या दुरुस्तीसाठी आलेल्या अर्जाची तालुकानिहाय संख्या घोषित करावी, अशी मागणी आस या शिक्षक संघटनेच्या वतीने जि.प.चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर संघटनेचे प्रांताध्यक्ष युवराज पोवाडे, जिल्हाध्यक्ष सय्यद नईमोद्दीन वकिलोद्दीन, सुधाकर गायकवाड, सुदर्शन उपलंचवार, सारीपुत्र चावरे आदींच्या सह्या आहेत.