थोडक्यात महत्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST2021-06-03T04:14:15+5:302021-06-03T04:14:15+5:30
नांदेड : ऑटोरिक्षा परवानाधारकांना १ हजार ५०० रुपये अनुदान बँक खात्यात ऑनलाईनद्वारे जमा करण्यात येत ...

थोडक्यात महत्वाचे
नांदेड : ऑटोरिक्षा परवानाधारकांना १ हजार ५०० रुपये अनुदान बँक खात्यात ऑनलाईनद्वारे जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षाचालकांनी आपली ऑनलाईन माहिती मोबाईलवरून किंवा सीएससी सेंटरवर जाऊन नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. आतापर्यंत ६ हजार ६९७ पैकी २ हजार ७१२ जणांचे अर्ज केले आहेत.
निळा आरोग्य केंद्राअंतर्गत बैठक
नांदेड : निळा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आरोग्यविषयक जनजागृतीसाठी माजी सभापती शीला निखाते यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी काॅंग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस आशा पारवेकर, बी. डी. थोटावार, सरपंच इंगोले, वैद्यकीय अधिकारी संगीता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कोरोना रुग्ण व लसीकरणाविषयी माहिती घेण्यात आली. निळा केंद्राअंतर्गत ३ हजार ६०० जणांना लसीकरण करण्यात आले आहे.
कोळेकर सेवानिवृत्त
नांदेड : गुरूनानक विद्यामंदिर, शिवनगर येथील शिक्षक साहेबराव अर्जुनराव कोळेकर हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजीराव देलमडे, बाबूराव घुगे, विलास वेणीकर, दिगंबर घोलप, एस. एस. मुगटकर, श्रीपती जानकर, मारोतराव मेखाले, बालाप्रसाद काबरा, बालाजीराव कोळी आदी उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
नांदेड : देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा बुद्ध विहारात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तथागत गौतम बुद्ध, अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे, दीपक सातोरे, सुभाष लोखंडे, निर्मलाबाई पंडित, शिल्पा लाेखंडे, शोभाबाई गोडबाेले यांची प्रमुख उपस्थिती होती.
समविचारी पक्षातर्फे होळकर जयंती साजरी
नांदेड : भारतीय कम्युनिस्ट पक्ष युनायटेड व समविचारी पक्ष संघटनेच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयटीआय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. इरवंत सूर्यकर, प्रा. देविदास इंगळे, मोरे आदींची उपस्थिती होती.
रोजगार हमी योजनेची कामे ठप्प
नांदेड : जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांची मागील दोन वर्षाच्या तुलनेत संख्या घटली असून, त्यामुळे किनवट, माहूर, उमरी, धर्माबाद आदी तालुक्यातील मजुरांना घरीच बसण्याची वेळ आली आहे. या भागातील मजूर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात शेजारच्या तेलंगणात स्थलांतरित होतात. गत वर्षापासून मजूर कोरोनामुळे आपल्या गावी परतले आहेत.
कार्यालयात शुकशुकाट
नांदेड : मागील दोन महिन्यांपासून कोरोनामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. शासनाने नुकतेच २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला मान्यता दिली आहे. संबंधित कार्यालयात कामाशिवाय नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे यापुढील काळातही कार्यालयातील नागरिकांची वर्दळ थांबणार आहे. कोरोनामुळे अनेक विकास कामे ठप्प झाली आहेत.