थोडक्यात महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST2021-05-16T04:16:58+5:302021-05-16T04:16:58+5:30

मरखेल : सततची नापिकी, अतिवृष्टी, मजुरांची कमतरता, मजुरीचे वाढते दर, खत, बी-बियाण्यांच्या दरात होणारी वाढ यामुळे शेतकरी ...

In short important | थोडक्यात महत्वाचे

थोडक्यात महत्वाचे

मरखेल : सततची नापिकी, अतिवृष्टी, मजुरांची कमतरता, मजुरीचे वाढते दर, खत, बी-बियाण्यांच्या दरात होणारी वाढ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, त्यात गतवर्षीपासून सुरु असलेल्या कोरोना संकटामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी यामुळे शेती म्हणजे ‘असून अडचण अन् नसून खोळंबा’, असा प्रकार झाला आहे. लहरी हवामानामुळे शेती ही बिनभरवशाची झाली असून, जगाचा पोशिंदा आज कर्जबाजारी झाला आहे. कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्याला उभारी देण्याची गरज आहे.

विकास कामे खोळंबली

माहूर : ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे सक्तीचे करावे, ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक प्रणाली पुन्हा सुरू करावी, अशी मागणी गोरसेनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली. सध्या करोना, पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. ग्रामपातळीवर लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचे व ग्रामीण भागातील जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने ग्रामसेवक या प्रशासनातील ग्रामपातळीवरील कर्मचाऱ्यावर असते; परंतु तालुक्यातील अनेक ग्रामसेवक मुख्यालयाला दांडी मारत आहेत. तालुकास्तरावरही ग्रामसेवक भेटत नाहीत, त्यांचे मोबाईलही बंद असतात.

व्यापाऱ्यांना फटका

देगलूर : लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना फटका बसत आहे. अनेक व्यापारी दुकान बंद करून बसले आहेत. अनेक दुकाने खासगी फायनान्स व सावकारी कर्ज काढून उभारण्यात आली. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करायची या चिंतेत आहेत. दुकाने चालू असतील तर सर्व व्यवहार सुरळीत होतात.

गोळ्या, औषधी भेट

किनवट : जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्राला बालाजी आलेवार यांच्याकडून गोळ्या व औषधी भेट देण्यात आल्या. आलेवार भाजपा तालुका सरचिटणीस आहेत. यापूर्वी त्यांनी इस्लापूर, शिवणी, अप्पारावपेठ या प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोरोना आजारावरील सहा हजार गोळ्या स्वखर्चातून उपलब्ध करून दिल्या होत्या.

रस्त्याचे भूमिपूजन

फुलवळ : कंधारेवाडी ता. कंधार येथे पालकमंत्री पाणंद शेत रस्ताकामाचे भूमिपूजन मंडळ अधिकारी एस.आर. शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच शंकर डिगोळे, तलाठी गणेश गटकळ, ग्रामसेवक एम.एस.टेभुर्णे, भगवान कंधारे, नागोराव केंद्रे व ग्रामस्थ उपस्थित होते.

देळूब रस्त्याचे डांबरीकरण होणार

पार्डी : देळूब-उमरी येथील वादग्रस्त रस्त्याचा प्रश्न तालुका प्रशासन, पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या समन्वयाने मिटला आहे. आता पूर्ण डांबरीकरणाचा रस्ता होणार असल्याने ५ गावांच्या रस्त्याचा कायमचा प्रश्न मिटला. याकामी तहसीलदार सुजीत नरहरे यांनी पाठपुरावा केला होता. मालेगाव-उमरी-देळूब-पार्डी (म) या नवीन रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाला. या रस्त्याचे काम सुरू झाले. एक वर्षापासून उमरी येथील दोन शेतकऱ्यांच्या वादात एक किलोमीटर रस्त्याचे काम संबंधित शेतकऱ्यांनी रोखले होते.

पांदण रस्त्याचे काम सुरू

उमरी : तालुक्यातील धानोरा बु. येथील साडेतीन किलोमीटर लांबीच्या पांदण रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे. कामाच्या उद्घाटनप्रसंगी यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष सुधाकरराव देशमुख, आनंदराव सलगरे पाटील, सरपंच इरबा टोम्पे, उपसरपंच कैलासराव देशमुख, भगवानराव सर्जे, उपसभापती प्रतिनिधी दत्तराम पाटील मुंगल आदी उपस्थित होते.

Web Title: In short important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.