अर्धापूर/कंधार (नांदेड ) : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात खाजगी संस्थेवर कार्यरत शिक्षकाचा अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव पाटीजवळ एका लॉजमध्ये आज सकाळी ११ वाजता मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आशिष भाऊसाहेब शिंदे ( रा. गुंटूर ता.कंधार ) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्धापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव महादेव परिसरात हॉटेल स्वराज फॅमिली रेस्टॉरंट आणि लॉज आहे. येथे आशिष भाऊसाहेब शिंदे हे शिक्षक मुक्कामास होते. दरम्यान, आज सकाळी शिंदे आपल्या रूममध्ये अत्यवस्थ अवस्थेत आढळून आले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, भिमराव राठोड, राजेश गुट्टलवाड आदींनी भेट देऊन रुग्णवाहिकेद्वारे शिंदे यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून शिंदे यांना मृत घोषित केले.
खाजगी संस्थेत होते शिक्षकआशिष भाऊसाहेब शिंदे हे कंधार येथील एका संस्थेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते शुक्रवारी रात्री लॉजमध्ये मुक्कामी होते. त्यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. सदरचा प्रकार आत्महत्या की घातपात या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे.