सेतू सुविधा केंद्र ‘हाऊसफुल्ल’
By Admin | Updated: June 27, 2014 00:11 IST2014-06-26T23:12:47+5:302014-06-27T00:11:05+5:30
जालना : महाविद्यालयीन प्रवेशाकरीता लागणाऱ्या विविध प्रमाणपत्रांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सेतू सुविधा केंद्रात पालकांसह विद्यार्थ्यांची दररोज गर्दी होत आहे.

सेतू सुविधा केंद्र ‘हाऊसफुल्ल’
जालना : महाविद्यालयीन प्रवेशाकरीता लागणाऱ्या विविध प्रमाणपत्रांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सेतू सुविधा केंद्रात पालकांसह विद्यार्थ्यांची दररोज गर्दी होत आहे. मात्र केंद्रात एकच नायब तहसीलदार असल्याने त्यांच्यावर सर्व ताण पडत आहे. अन्य एक नायब तहसीलदार व अव्वल कारकून येथे येतच नसल्याचे समजते.
सध्या सर्वत्र महाविद्यालयीन प्रवेशाची घाई सुरू आहे. त्यासाठी विविध प्रमाणपत्रांची गरज असल्याने ही प्रमाणपत्रे सेतू सुविधा कार्यालयातून मिळवावी लागतात. जातीचे प्रमाणपत्र हे उपविभागीय कार्यालयातून प्रमाणित करून सेतू द्वारे मिळते.
जालना शहराबरोबरच तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक आपल्या विविध कामांसाठी सेतू सुविधा केंद्रात येतात. त्यासाठी दररोज केंद्रात नागरिकांच्या रांगा लागत आहेत. एवढेच नव्हे, तर खिडकीतूनही काहीजण फॉर्म खरेदी करत आहेत. मात्र ही प्रमाणपत्रे विलंबाने मिळत असल्याचे काही लाभार्थ्यांनी सांगितले.
केंद्रात दोन नायब तहसीलदार आणि एक अव्वल कारकून अशा तीन जणांची नियुक्ती आहे. मात्र प्रत्यक्षात केंद्रात एकच नायब तहसीलदार हजर असतात, अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय तहसील कार्यालयात प्रमाणपत्रांच्या कामासाठी जे मंडळ अधिकारी नियुक्त आहेत, तेही वेळेवर उपलब्ध होत नाहीत, अशी माहिती हाती आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेतू सुविधा केंद्रात कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या आहे. मात्र केंद्रात नियुक्त अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. (प्रतिनिधी)
गर्दीमुळे खिडकीतूनही होतेय फॉर्मची विक्री
गुरूवारी सेतू सुविधा केंद्रात पाय ठेवायलाही जागा नाही, अशी स्थिती होती. त्यामुळे काही जणांनी खिडकीतूनच फॉर्मची खरेदी केली. या केंद्रात पुरेशा अधिकाऱ्यांची उपस्थिती नसल्याने एकट्या अधिकाऱ्यावरच ताण पडत असल्याचे चित्र दिसून आले.
विविध प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी जून, जुलै या काळातच अधिक गर्दी होते. मात्र या कालावधीत प्रशासनाकडून सेतू सुविधा केंद्रासाठी आवश्यक असलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक होणेही गरजेचे असल्याचे मत काही जणांनी व्यक्त केले.