नांदेड : सीबीआयची मुख्याधिकारी बोलत असल्याचे सांगून एका महिलेने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास २८ लाख रुपयांना चुना लावला. ही घटना ९ जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात महिले आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड शहरातील श्रीनगर भागात वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त कर्मचारी खंडोजी तोलाजी बायस (वय ७२) यांना ४ जुलै ते ९ जुलैदरम्यान अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर व्हाइस व व्हिडीओ कॉल आले. त्यात आरोपी महिलेने आपण सीबीआयची अधिकारी असल्याची बतावणी केली. तसेच त्यांना तुमचे मुंबई येथील बँक खात्यातील रक्कम माझ्या खात्यात जमा करा, नाहीतर तुम्हाला सीबीआयमार्फत अटक करण्यात येईल, अशा आशयाच्या धमक्या दिल्या. त्यानंतर खंडोजी बायस यांनी भीतीपोटी आरोपी महिलेच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे २८ लाख रूपये जमा केले. त्यानंतर खंडोजी बायस यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी बायस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि थडवे हे करीत आहेत.