५० हजारांच्या देशी दारूसह साडेआठ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:17 IST2021-04-13T04:17:14+5:302021-04-13T04:17:14+5:30
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील 'डीबी' तथा गुन्हे शोध पथकातील पो. कॉ. शिवाजी पाटील, नाईक पो. कॉ. संतोष जाधव, संतोष ...

५० हजारांच्या देशी दारूसह साडेआठ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील 'डीबी' तथा गुन्हे शोध पथकातील पो. कॉ. शिवाजी पाटील, नाईक पो. कॉ. संतोष जाधव, संतोष कऱ्हाळे व पो.कॉ. रेवणनाथ कोरोनामुळे १० एप्रिल रोजी सायंकाळी पाचचेदरम्यान, भगतसिंग चौक ते हस्सापूर पुलाच्या परिसरात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, एका गुप्त बातमीदाराने सायंकाळी पावणे सहावाजेच्यादरम्यान, उपरोल्लेखित रस्त्याने एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात दोन तरूण देशी दारूचे २० बॉक्स घेवून येत असल्याची खात्रीशीर माहिती पो. कॉ. शिवा पाटील यांना दिली. ही माहिती समजताच संशयित कारची तपासणी केली. यावेळी सदर कारमध्ये भिंगरी- संत्रा नावाच्या देशी दारूचे तब्बल २० बॉक्स आढळून आले.
दरम्यान, पोलिसांनी उपरोक्त कार चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य एका तरूणास ताब्यात घेतले. सदर तरूणांनी त्यांचे नाव अक्षय देविदास राठोड (वय-२७ वर्षे, व्यवसाय-कारचालक रा. एम.जी.एम. कॉलेज परिसर, नांदेड) आणि पवन प्रमोद जमदाडे (वय-२२ वर्षे, व्यवसाय-मजुरी, रा. समता नगर, नांदेड) असे असल्याचे सांगितले. याशिवाय, हा माल मुखेड येथील राजेश गजलवाड यांच्याकडून तसेच त्यांचे सांगण्यावरून विनापरवाना व चोरटी दारू विक्री करण्याचे उद्देशाने आणलो असल्याचे पोलिसांना सांगितले. घटनास्थळावरून तब्बल ४९ हजार ९२० रूपयांची देशीदारू व ८ लाखांची एक कार असा एकूण ८ लाख ४९ हजार ९२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पो.कॉ. शिवाजी गंगाधर पाटील यांच्या तक्रारीचेआधारे तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोउपनि. गणपत गिते हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.