जिल्ह्यातील शाळा सुरू, महाविद्यालये मात्र बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST2021-02-05T06:10:53+5:302021-02-05T06:10:53+5:30

कोरोना महामारीमुळे देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालये बंद करावी लागली. ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाचे संकट आल्याने ...

Schools open in the district, colleges closed! | जिल्ह्यातील शाळा सुरू, महाविद्यालये मात्र बंदच !

जिल्ह्यातील शाळा सुरू, महाविद्यालये मात्र बंदच !

कोरोना महामारीमुळे देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालये बंद करावी लागली. ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाचे संकट आल्याने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षाही पुढे ढकलाव्या लागल्या. दरम्यानच्या काळात परीक्षा होणार की नाही, याबाबत बराच गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम झाला. सध्या पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यापूर्वी नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणताच निर्णय घेण्यात येत नसल्याने विद्यार्थी प्रतीक्षा करत आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या जिल्ह्यांतील २४० महाविद्यालयांची संख्या असून या महाविद्यालयांत शिकणाऱ्या ९९ हजारांवर विद्यार्थ्यांना महाविद्यालये उघडण्याची प्रतीक्षा आहे. मागील ११ महिन्यांपासून महाविद्यालये बंद असून त्यामुळे २०२०-२१ या वर्षात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

शासनाने महाविद्यालये सुरू करण्याची गरज आहे. कारण पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आता पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्यास काहीच हरकत नाही. मात्र शासनाने अद्याप निर्णय घेतला नाही.

- दिनेश बत्तलवाड, विद्यार्थी

एकीकडे शासन चित्रपटगृह सुरू करत आहे. प्रार्थनास्थळे सुरू करत आहे. दळणवळणाची साधनेही सुरू झाली आहेत. मग महाविद्यालये सुरू करण्यास कोणती अडचण येत आहे? सर्वात अगोदर महाविद्यालये सुरू करणे गरजेचे आहे.

- शीतल महाजन, विद्यार्थी

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सर्व गर्दीची ठिकाणे सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयेसुद्धा सुरू करण्यास हरकत नाही. शासनाने लवकरात लवकर महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी आहे.

- प्रियंका गायकवाड, विद्यार्थी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन महाविद्यालये सुरू करावीत. कारण मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. हे वर्षसुद्धा गोंधळाचे जाऊ नये, यासाठी आता महाविद्यालये सुरू होणे आवश्यक आहे.

- अष्टगाथा कावळे, विद्यार्थी

Web Title: Schools open in the district, colleges closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.