मास्कने घालविली लिपस्टीकची लाली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:19 IST2021-04-28T04:19:15+5:302021-04-28T04:19:15+5:30

नांदेड : कोणताही कार्यक्रम असो किंवा खरेदीसाठी बाहेर पडायचे असो. स्त्रिया मेकअप केल्याशिवाय दरवाजाही ओलांडत नाहीत. मेकअपमध्ये ओठांना लावण्यात ...

The redness of the lipstick worn by the mask! | मास्कने घालविली लिपस्टीकची लाली !

मास्कने घालविली लिपस्टीकची लाली !

नांदेड : कोणताही कार्यक्रम असो किंवा खरेदीसाठी बाहेर पडायचे असो. स्त्रिया मेकअप केल्याशिवाय दरवाजाही ओलांडत नाहीत. मेकअपमध्ये ओठांना लावण्यात येणाऱ्या लिपस्टीकलाही खूप महत्त्व आहे. लिपस्टीक कोणत्या रंगाची असावी यापासून स्त्रियांमध्ये चर्चा सुरू असते. परंतु गेल्या वर्षभरात कोरोनामुळे लिपस्टीकची लाली घालविली आहे. घराबाहेरच पडता येत नाही, अन् निघाले तरी तोंडावर मास्क लावावा लागत असल्यामुळे लिपस्टीक लावूनही उपयोग नाही. अशी अवस्था सध्या स्त्रियांची झाली आहे.

गेल्या वर्षभरापासून लग्नसराई, इतर कार्यक्रमांवर बंधने घालण्यात आली आहेत. अनेकवेळा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता मनसोक्त खरेदीसाठी महिलांना घराबाहेर पडताच आले नाही. सण-उत्सवही घरच्या घरी अत्यंत साधेपणाने साजरे करावे लागले. त्यामुळे मेकअप किंवा लिपस्टीकचा विषयच उरला नाही. त्यामुळे सौंदर्य प्रसाधने विक्री करणारे आणि ब्युटी पार्लर चालकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

आर्थिक फटका

गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे दुकान सुरू कमी आणि बंदच अधिक दिवस राहिले आहे. त्यातही लग्नसराईतही लोकांनी आखडता हात घेतला आहे. त्यामुळे सौंदर्य प्रसाधने खरेदीसाठी सहसा महिला बाहेर पडत नाहीत. त्यामुळे मोठा फटका बसला आहे. दुकानातील अनेक मालाच्या विक्रीची मुदतही आता संपत आली आहे. त्यामुळे ते फेकावे लागणार आहे.

- विक्रेता

लिपस्टीक पडूनच

गेल्या वर्षभरात फक्त दोन वेळेला घराबाहेर पडले. ते ही किरकोळ साहित्य खरेदी करण्यासाठी. परंतु त्यावेळी तोंडाला मास्क लावावा लागला होता. त्यामुळे लिपस्टीक लावण्याचा प्रश्नच नाही. लावली लिपस्टीक तर ती मास्कला लागणार. वर्षभरात लिपस्टीक केवळ दोन ते तीन वेळेस हातात घेतली. परंतु न लावताच ठेवून दिली.

- रजनी देशमुख

घरातच कोंडून

कोरोनामुळे सर्व कुटुंबीयांनी घरातच कोंडून घेतले आहे. फक्त किराणा साहित्य खरेदीसाठी बाहेर पडतो. कपडे किंवा इतर सौंदर्य प्रसाधने गेल्या वर्षभरात खरेदी केलीच नाही. सणही साधेपणाने साजरे केले. त्यामुळे मेकअप करण्याचा योगच आला नाही. बाहेर निघाले तरी, मास्क असतो. त्यामुळे लिपस्टीकचा उपयोग काहीच नाही.

- दिव्या सोनकांबळे

माझ्या ग्राहकांशी फोनवर अनेकवेळा संपर्क साधला. घरी येऊन सेवा देण्याची तयारी दाखविली. परंतु २४ तास घरातच राहणार आहे. त्यामुळे ब्युटी पार्लर कशाला? असे उत्तर मिळाले. अशीच परिस्थिती सगळीकडे आहे.

- ब्युटी पार्लर चालक

गेल्या वर्षभरापासून ब्युटी पार्लर व्यवसायाला अवकळा आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये लग्नसराई असते. त्यावेळी आमचा सिझन असतो. परंतु मागील लग्नसराई हातची गेली. यंदा परिस्थिती सुधारेल असे वाटले. परंतु यंदाही लग्न सोहळ्यावर बंधने आहेत. त्यामुळे लग्नाची मोठी ऑर्डर मिळालीच नाही. फक्त वधू आणि घरातील इतर दोन ते तीन स्त्रिया एवढ्यांचेच मेकअप करण्याचे काम मिळाले.

- ब्युटी पार्लर चालक

Web Title: The redness of the lipstick worn by the mask!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.