Publisher's Work | अक्षरनाती जोडण्याचे काम प्रकाशकांचे

अक्षरनाती जोडण्याचे काम प्रकाशकांचे

ठळक मुद्देप्रकाशन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांचे प्रतिपादन

नांदेड : प्रकाशनक्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक प्रकाशकांना जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष प्रकाशकाच्या कौटुंबिक जीवनापर्यंत पोहोचतो. मुद्रण, प्रकाशन आणि लेखन या तिन्ही बाबी जपत निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी मांडलेला ‘अक्षरनाती’ हा आत्मकथनपर ग्रंथ म्हणजे प्रत्येक प्रकाशकाच्या जीवनाचा संघर्षप्रवास होय, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, ख्यातनाम प्रकाशक बाबा भांड यांनी व्यक्त केले.
प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांच्या ‘अक्षरनाती’ या आत्मकथनाचे बाबा भांड यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील तर अ़ भा़ मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत, प्रा.श्यामल पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती़
मराठवाड्यातील पहिला प्रकाशक म्हणून सुरू झालेला प्रवास मराठवाड्याच्या साहित्यभूमीला समृद्ध करणारा ठरला. चारशे ग्रंथांची निर्मिती करीत तितक्याच लेखकांना सांभाळण्याचे काम केल्याचे बाबा भांड यांनी सांगितले़
प्रा. श्यामल पत्की म्हणाल्या, निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी अक्षरनाती या गं्रथाच्या माध्यमातून जीवनाची प्रतिमा आणि जगण्याचे भान व्यक्त केले़ प्रा.दत्ता भगत म्हणाले, सूर्यवंशी यांनी जे आवडलं, जे जपलं, जे भोगलं तेच त्यांनी ‘अक्षरनाती’तून व्यक्त केलं आहे. प्रारंभी निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी आपला ४८ वर्षांचा प्रवास कथन केला़ सर्वोच्च न्यायालयातील विधिज्ञ आणि निर्मलकुमार यांचे सुपुत्र अमोल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले तर प्रा. दिगंबर सूर्यवंशी यांनी आभार मानले.


‘अंतर्मनाला डोळे फोडण्याचे काम साहित्य करते’
समाजाचं आपण काही देणं लागतो, याची जाणीव ठेवून साहित्यनिर्मिती केली पाहिजे, कारण अंतर्मनाला डोळे फोडण्याचे काम साहित्य करीत असते, असे मत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title: Publisher's Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.